मराठी बातम्या  /  बिझनेस  /  yes bank layoffs : येस बँकेने ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, कारण ऐकून तुमचीही चिंता वाढेल!

yes bank layoffs : येस बँकेने ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, कारण ऐकून तुमचीही चिंता वाढेल!

Jun 26, 2024 10:09 AM IST

Yes bank Lays off news : येस बँकेनं आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला असून येत्या काही दिवसांत आणखी काही कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

येस बँक ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, कारण सर्वांनाच काळजीत टाकणारं!
येस बँक ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, कारण सर्वांनाच काळजीत टाकणारं!

Yes bank Lays off news : खासगी क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक असलेल्या येस बँकेनं ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. बँकेच्या फेररचनेच्या प्रक्रियेअंतर्गत खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत बँकेतील आणखी काही कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

इकॉनॉमिक टाइम्सनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, येस बँकेनं एका बहुराष्ट्रीय सल्लागाराच्या सल्ल्यानुसार अंतर्गत पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या वेतनाएवढी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. येत्या आठवड्यात आणखी कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. येस बँकेनं याला दुजोरा देत आपल्या कर्मचाऱ्यांचा समतोल राखायचा असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

येस बँक म्हणते…

'आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी आणि बँक पूर्ण क्षमतेनं काम करत आहे हा विश्वास शेअरहोल्डर्सना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. भविष्यातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकणारी एक मजबूत संस्था उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या बदलांमध्ये मनुष्यबळाचा महत्त्वाचा वाटा असेल. या बदलासाठी आवश्यक आणि पूरक असं मनुष्यबळ असावं, असा आमचा प्रयत्न आहे, असं बँकेच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं.

डिजिटल बँकिंगवर भर

येस बँकेला डिजिटल बँकिंगवर भर द्यायचा असून हातानं केली जाणारी कामं कमीत कमी करायची आहेत. तसं झाल्यास खर्चात मोठी कपात करता येणार आहे. सध्या सुरू असलेल्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेमुळं बँकेला ऑपरेशनल खर्चात कपात करण्यास मदत होईल, असं सूत्रांनी सांगितलं.

कर्मचाऱ्यांवर किती होतोय खर्च?

गेल्या आर्थिक वर्षात येस बँकेच्या परिचालन खर्चात (Operating Cost) सुमारे १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या खर्चात १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. आर्थिक वर्ष २०२४ अखेर बँकेनं कर्मचाऱ्यांवर ३७७४ कोटी रुपये खर्च केले होते, तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३३६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आर्थिक वर्ष २०२४ अखेर बँकेत सुमारे २८,००० कर्मचारी होते. वर्षभरात त्यात ४८४ कर्मचाऱ्यांची भर पडली होती.

WhatsApp channel
विभाग