नाव मोठं, लक्षण खोटं! २०२४ मध्ये या कंपन्यांच्या आयपीओंनी केली गुंतवणूकदारांची निराशा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  नाव मोठं, लक्षण खोटं! २०२४ मध्ये या कंपन्यांच्या आयपीओंनी केली गुंतवणूकदारांची निराशा

नाव मोठं, लक्षण खोटं! २०२४ मध्ये या कंपन्यांच्या आयपीओंनी केली गुंतवणूकदारांची निराशा

Dec 06, 2024 03:25 PM IST

Year Ender IPO 2024 : वर्ष संपता-संपता शेअर बाजारात घडलेल्या घडामोडींचा वेध घेणं फायद्याचं ठरावं. जाणून घेऊन या वर्षातील गाजलेल्या आयपीओंची कामगिरी

शेअर बाजारात घसरण फोटो क्रेडिट- गुंतवणूकदार निरीक्षक
शेअर बाजारात घसरण फोटो क्रेडिट- गुंतवणूकदार निरीक्षक

Year Ender IPO 2024 : इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओसाठी २०२४ हे वर्ष उत्तम आणि संस्मरणीय ठरलं. एकीकडं देशातील सर्वात मोठा ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ या वर्षी लाँच करण्यात आला. तर, दुसरीकडं स्विगी, ओला आणि फर्स्टक्राय हे बहुप्रतीक्षित आयपीओ देखील लाँच झाले. 

गुंतवणूकदार वर्षानुवर्षे ज्यांची वाट पाहत होते, अशा कंपन्यांचे हे आयपीओ होते. २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडिया, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, बजाज हाऊसिंग फायनान्स, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, फर्स्टक्रायची मूळ कंपनी ब्रेनबिझ सोल्यूशन्ससह आयपीओ चर्चेत होते. मात्र, यापैकी बहुतेकांनी लिस्टिंगबाबत गुंतवणूकदारांची निराशा केली. 

जाणून घेऊया नेमकं काय झालं?

ह्युंदाई मोटर इंडिया

दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईची भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचा आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा होता. २७८७०.१६ कोटींचा हा आयपीओ १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. याचा दरपट्टा १९६० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. मात्र, हा आयपीओ केवळ २ पट सब्सक्राइब झाला. कंपनीचे शेअर्स १.३३ टक्के घसरून १९३४ रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होत आहे.

स्विगी आयपीओ

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा आयपीओ ११,३२७ कोटी रुपयांचा होता. हा आयपीओ ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होता. किंमत पट्टा ३९० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. स्विगीचा आयपीओ ३.५९ पट सब्सक्राइब झाला होता. मात्र, लिस्टिंगमध्ये कंपनीच्या शेअर्सने विशेष कामगिरी केली नाही. त्याचे शेअर्स केवळ ७ टक्के प्रीमियमसह ४२० रुपयांवर सूचीबद्ध झाले.

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचा ६१४५.५६ कोटी रुपयांचा आयपीओ २ ते ६ ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला. आयपीओमध्ये शेअरची किंमत प्रत्येकी ७६ रुपये होती. इलेक्ट्रिक टू व्हीलर्स बनवणाऱ्या कंपनीचा इश्यू ४ पटीहून अधिक सब्सक्राइब झाला होता. कंपनीचे शेअर्स जेमतेम इश्यू प्राइसवर लिस्ट झाले. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर ७६ रुपयांवर लिस्ट झाला होता.

गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड

गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेडचा २,६१४.६५ कोटी रुपयांचा आयपीओ १५ ते १७ मे दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. त्याची किंमत २७२ रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनीचा हा इश्यू ९.६० पट सब्सक्राइब झाला. शेअर्सची लिस्टिंग निराशाजनक झाली. कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये २८६ रुपयांवर लिस्ट झाले, जे २७२ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा ५.१५ टक्के प्रीमियम आहे. बीएसईवर हा शेअर ३.३५ टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला.

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा आयपीओ ८ ते १० मे दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. त्याची आयपीओ किंमत ३१५ रुपये होती. तीन दिवसांत २६.७६ पट सब्सक्राइब झाले. कंपनीचे समभाग ३१५ रुपयांवर स्थिरावले होते.

या आयपीओंनी राखली लाज

बजाज हाऊसिंग फायनान्स

बजाज समूहातील कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ यंदा चर्चेत होता. ६,५६० कोटी रुपयांचा हा आयपीओ ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. त्याची आयपीओ किंमत ७० रुपये होती. या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ६७.४३ पट सब्सक्राइब झाला आणि ११४% प्रीमियमसह १५० रुपयांवर लिस्ट झाला.

फर्स्टक्राय आयपीओ

फर्स्टक्रायची मूळ कंपनी ब्रेनबिझ सोल्यूशन्सचा आयपीओ ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला. त्याची किंमत ४६५ रुपये प्रति शेअर होती आणि आयपीओचा आकार ४१९३.७३ कोटी रुपये होती. हा इश्यू १२.२२ पट सब्सक्राइब झाला. कंपनीचा शेअर ४० टक्के प्रीमियमसह ६५१ रुपयांवर लिस्ट झाला होता.

पुढच्या आठवड्यात येतोय आणखी एक मेगा आयपीओ

सुपरमार्केट क्षेत्रातील आघाडीची कंपनी विशाल मेगा मार्टचा ८,००० कोटी रुपयांचा आयपीओ आयपीओ ११ डिसेंबरला खुला होणार आहे. आयपीओ १३ डिसेंबरला बंद होणार असून मोठ्या (अँकर) गुंतवणूकदारांना १० डिसेंबरला बोली लावता येणार आहे. या आयपीओचा दरपट्टा ७८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. जीएमपी १३ टक्के प्रीमियमवर आहे. प्रस्तावित आयपीओ पूर्णपणे प्रवर्तक समय सर्व्हिसेस एलएलपीच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आहे. विशाल मेगा मार्टमध्ये सध्या समय सर्व्हिसेस एलएलपीचा ९६.५५ टक्के हिस्सा आहे.

Whats_app_banner