Xpro India Share Price : बिर्ला समूहाची कंपनी एक्सप्रो इंडियाने छप्परफाड परतावा दिला आहे. गेल्या चार वर्षांत एक्सप्रो इंडियाचा शेअर १४ रुपयांवरून १००० रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये ७६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एक्सप्रो इंडियाच्या शेअर्सने ४ वर्षांत १ लाख रुपयांची गुंतवणूक १ कोटी रुपयांहून अधिक केली आहे. बोनस शेअर्सच्या बळावर कंपनीच्या शेअर्सनी हा चमत्कार करून दाखवला आहे. गेल्या ४ वर्षात एकदा कंपनीनं बोनस शेअर्स भेट दिले आहेत.
बिर्ला समूहाची कंपनी एक्सप्रो इंडियाचा शेअर १ ऑक्टोबर २०२० रोजी १४.१० रुपयांवर होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला एक्सप्रो इंडियाचे ७०९२ शेअर्स मिळाले असते. कंपनीने जुलै २०२२ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. म्हणजेच कंपनीने प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर दिला आहे. बोनस समभाग जोडल्यास एक लाख रुपयांपासून खरेदी केलेल्या समभागांची एकूण संख्या १०,६३८ इतकी होईल. एक्सप्रो इंडियाचा शेअर ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी १०९६.९५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार १०,६३८ शेअर्सचे सध्याचे मूल्य १.१६ कोटी रुपये आहे.
एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षात ६५०८ टक्के वाढ झाली आहे. १ नोव्हेंबर २०१९ रोजी कंपनीचा शेअर १६.६० रुपयांवर होता. बिर्ला समूहाच्या या कंपनीचा शेअर ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी १०९६.९५ रुपयांवर बंद झाला. तर गेल्या ३ वर्षात या शेअरमध्ये १९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी कंपनीचा शेअर ३७९.२० रुपयांवर होता. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर १०९६.९५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२९५.५० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८६१ रुपये आहे.