Xpro India Share price : बिर्ला समूहाची कंपनी एक्सप्रो इंडियाच्या शेअरनं अवघ्या ४ वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. या कंपनीच्या समभागांनी चार वर्षांच्या कालावाधीत गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स चार वर्षांत १५ रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
एक्सप्रो इंडियाच्या शेअर्सनी गेल्या ४ वर्षांत ७७०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. कंपनीनं या काळात एकदा बोनस शेअर्सची भेटही दिली आहे. याच बोनस शेअर्सच्या बळावर कंपनीनं गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे १ कोटी रुपये केले आहेत.
एक्सप्रो इंडियाचा शेअर २१ ऑगस्ट २०२० रोजी १५.३३ रुपयांवर होता. एखाद्या व्यक्तीनं २१ ऑगस्ट २०२० रोजी एक्सप्रो इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला कंपनीचे ६,५२० शेअर्स मिळाले असते. एक्सप्रो इंडियानं जुलै २०२२ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर दिला आहे. या बोनस शेअर्सचा आकडा त्यात मिळवला तर १ लाख रुपयांपासून खरेदी केलेले एकूण शेअर्स ९,७८० होतात. २१ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर १,२०२ रुपयांवर बंद झाला. त्यानुसार या शेअर्सची सध्याची किंमत १.१७ कोटी रुपये आहे.
मागच्या तीन वर्षांत कंपनीचे शेअर्स ५५७ टक्क्यांनी वधारले आहेत. २० ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीचा शेअर १८२.७३ रुपयांवर होता. एक्सप्रो इंडियाचा शेअर २१ ऑगस्ट २०२४ रोजी १२०२ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअरमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२९५.५० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८३६ रुपये आहे.