Xiaomi vs Tesla Model 3: चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार एसयू ७ लॉन्च केली आहे. टेक जायंटने आज (२८ मार्च २०२४) झालेल्या एका कार्यक्रमात या इलेक्ट्रिक कारची किंमत जाहीर केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कारची किंमत बाजारात असलेल्या टेस्ला मॉडेल ३ पेक्षा कमी आहे. ही कार बाजारात दाखल झाल्यानंतर कार चाहत्यांना आकर्षित करेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शाओमीने एसयू ७ इलेक्ट्रिक कार २,१५,९०० युआन (अंदाजे २४.९० लाख रुपये) च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केली आहे, जी चीनमधील टेस्ला मॉडेल ३ च्या किंमतीपेक्षा कमी आहे. ईव्ही निर्मात्याने सांगितले आहे की, या महिन्यापासून आपल्या ग्राहकांना एसयू ७ ची डिलिव्हरी सुरू करतील. खरेदीदारांना आकर्षित करणारी ही कार चीनमधील अनेक शोरूममध्ये प्रदर्शित करण्यात आली. टेक जायंटने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथमच एसयू ७ सार्वजनिकरित्या प्रदर्शित केली होती.
शाओमी एसयू ७ ईव्ही चार व्हेरियंटमध्ये लॉन्च झाली आहे. यामध्ये एंट्री लेव्हल व्हर्जन, प्रो व्हेरियंट, मॅक्स व्हर्जन तसेच लिमिटेड फाउंडर्स एडिशनचा समावेश आहे. एसयू ७ ही चार दरवाजांची इलेक्ट्रिक सेडान कार आहे. या कारची लांबी ४ हजार ९९७ मिमी, रुंदी १ हजार ९६३ मिमी आणि उंची १ हजार ४५५ मिमी आहे.
शाओमी एसयू ७ टॉप-एंड मॅक्स आवृत्ती २६५किमी प्रतितासाचा टॉप स्पीड देऊ शकते. ही कार अवघ्या २.७८ सेकंदात ०-१०० किमी अंतर गाठू शकते. एकदा चार्ज केल्यावर ८१० किमीपर्यंत रेंज देऊ शकते. फाउंडर्स एडिशन केवळ १.९८ सेकंदात सुमारे ९८६ बीएचपी पॉवर आणि ०-१०० किमी प्रतितास स्प्रिंट देऊ शकते.
एंट्री लेव्हल व्हेरियंटमध्ये ७३.६ किलोवॅटबॅटरी पॅक देण्यात आला आहे. टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरियंटमध्ये १०१ किलोवॅटचा मोठा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. टेक जायंटच्या म्हणण्यानुसार, बॅटरी एकदा चार्ज केल्यावर कमीत कमी ७०० किलोमीटर धावेल. शाओमी कंपनी पुढील वर्षी १५० किलोवॅटचा मोठा बॅटरी पॅक लॉन्च करण्याची शक्यता आहे, जी एका चार्जमध्ये १२०० किलोमीटर धावेल.