Wipro Q3 Results : टीसीएस, एचसीएल टेक पाठोपाठ आता आयटी कंपनी विप्रोनं आपल्या भागधारकांना डिविडंडची भेट दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर होताच कंपनीनं या संदर्भात घोषणा केली आहे.
विप्रोला डिसेंबर अखेरच्या तिमाहीत ३३५४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. नफ्यातील ही वाढ वार्षिक आधारावर तब्बल २४ टक्के तर, तिमाही आधारावर ४.५ टक्के इतकी आहे. कंपनीचा महसूल ०.५ टक्क्यांनी वाढून २२,३१९ कोटी रुपये झाला आहे. विप्रोचं ऑपरेटिंग मार्जिन सुधारून १७.५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. मागील तीन वर्षांतील हा उच्चांक आहे. डिसेंबर २०२४ तिमाहीत विप्रोनं १७ मोठ्या डील केल्या आहेत. या करारांचं एकूण मूल्य १ अब्ज डॉलरपर्यंत आहे.
विप्रोच्या संचालक मंडळानं प्रति शेअर ६ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीनं अंतरिम लाभांशासाठी २८ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. लाभांशाची रक्कम १५ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी पात्र शेअरहोल्डर्सच्या खात्यात जमा होईल.
विप्रोनं नुकतीच आपल्या भागधारकांना बोनस शेअर्सची भेट दिली आहे. कंपनीनं १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर वितरित केला गेला. कंपनीनं यापूर्वी मार्च २०१९ मध्ये १:३ या प्रमाणात बोनस शेअर दिले होते. म्हणजेच प्रत्येक ३ शेअरमागे १ बोनस शेअर देण्यात आला होता. त्याआधी जून २०१७ मध्ये विप्रोनं १:१ या प्रमाणात बोनस शेअरही दिले होते.
आयटी कंपनी विप्रोच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात जवळपास १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १७ जानेवारी २०२४ रोजी विप्रोचा शेअर २४१.१५ रुपयांवर होता. तो आज २८१.८५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात विप्रोच्या शेअरमध्ये जवळपास ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २०८.४० रुपये आहे.
विप्रोच्या शेअरमध्ये मागच्या पाच दिवसांत जवळपास ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, आजच्या दिवसात कंपनीचा शेअर २.२० टक्क्यांनी घसरला.
संबंधित बातम्या