bonus shares news : मोठी बातमी! बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट विप्रोनं केली जाहीर, अजूनही संधी गेलेली नाही!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bonus shares news : मोठी बातमी! बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट विप्रोनं केली जाहीर, अजूनही संधी गेलेली नाही!

bonus shares news : मोठी बातमी! बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट विप्रोनं केली जाहीर, अजूनही संधी गेलेली नाही!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 22, 2024 11:34 AM IST

Wipro Bonus Shares : आतापर्यंत १३ वेळा शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देणाऱ्या विप्रोनं पुन्हा एकदा मोफत शेअर्सची घोषणा केली असून रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

विप्रोच्या शेअरहोर्ल्डसाठी मोठी बातमी! बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर
विप्रोच्या शेअरहोर्ल्डसाठी मोठी बातमी! बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर

Wipro Bonus Issue record date : देशातील एक प्रमुख आयटी कंपनी विप्रो लिमिटेडनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, विप्रो १४ व्यांदा बोनस शेअर्स देणार आहे. त्यामुळं आज कंपनीचे शेअर्स आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत.

आधीच केलेल्या घोषणेनुसार, विप्रो १:१ बोनस देणार आहे. म्हणजेच, पात्र भागधारकांना एका शेअरवर एक शेअर मोफत दिला जाणार आहे. त्यासाठी कंपनीनं मंगळवार, ३ डिसेंबर २०२४ रोजी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. काल, म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी कंपनीकडून रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली.

आतापर्यंत किती वेळा दिलाय बोनस?

दिग्गज आयटी कंपनी विप्रो लिमिटेडनं यापूर्वी १३ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. १९७१ मध्ये कंपनीनं पहिल्यांदा बोनस शेअर्स दिले. १९८१, १९८५, १९८७, १९८९, १९९२, १९९५, १९९७, २००४, २००५, २०१०, २०१७ आणि २०१९ मध्ये बोनस शेअर्स देण्यात आले आहेत.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीनं २०१० मध्ये ३ शेअरवर २ शेअर्सचा बोनस दिला होता. २०१७ मध्ये कंपनीनं एका शेअरवर १ शेअरचा बोनस दिला होता. तर २०१९ मध्ये विप्रो लिमिटेडनं ३ शेअर्सवर १ शेअर मोफत दिला होता.

गेल्या वर्षभरात शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी?

विप्रोचा शेअर गुरुवारी ०.७९ टक्क्यांनी घसरून ५५७.२० रुपयांवर बंद झाला. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २०.९१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, विप्रो लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत वर्षभरात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विप्रो लिमिटेडचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५८३ रुपये आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३९३.२० रुपये आहे. रेकॉर्ड डेट जाहीर झाल्यानंतर आज कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे. आज हा शेअर दोन टक्क्यांच्या जवळपास वाढून ट्रेड करत आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner