Wipro Share price : देशातील पहिल्या ५ मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोनं केलेली बोनस शेअरची घोषणा आज प्रत्यक्षात आली. आज या कंपनीचा शेअर एक्स डेट ट्रेड करत आहे. या पार्श्वभूमीवर आज, ३ डिसेंबर रोजी विप्रोच्या शेअरच्या किंमतीत किंचित घसरण झाली आहे. मात्र, कंपनीच्या शेअरनं मागच्या १५ वर्षांत अनेकांना लखपती केलं आहे.
विप्रोनं ३ डिसेंबर ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली होती. याचाच अर्थ आज कंपनीचे शेअर ज्यांच्याकडं आहेत, ते बोनसला पात्र ठरणार आहेत. कंपनीनं जाहीर केलेल्या बोनस इश्यूचं प्रमाण १:१ आहे. म्हणजेच, प्रत्येक एका शेअरमागे गुंतवणूकदारांना १ शेअर मोफत मिळणार आहे.
बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या १५ वर्षांतील विप्रोचा हा चौथा बोनस इश्यू आहे. याआधी २०१९ साली कंपनीनं बोनस जाहीर केला होता. त्यावेळी कंपनीनं १:३ च्या प्रमाणात शेअर्सचा बोनस शेअर दिले होते. म्हणजेच प्रत्येक तीन समभागांमागे एक बोनस शेअर देण्यात आला होता.
त्याआधी २०१७ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस दिला होता. २०१० मध्ये विप्रोनं २:३ या प्रमाणात बोनस इश्यू जाहीर केला. प्रत्येक तीन समभागांमागे दोन इक्विटी शेअर्स देण्यात आले.
विप्रोच्या शेअरनं गेल्या १५ वर्षांत गुंतवणूकदारांना दणदणीत परतावा दिला आहे. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात म्हणजेच २००९ मध्ये विप्रोच्या शेअरची किंमत ५० रुपये होती. त्यावेळी एखाद्यानं विप्रोच्या शेअर्समध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती, तर गेल्या काही वर्षांत कंपनीनं दिलेल्या बोनस शेअर्समुळं ही गुंतवणूक लक्षणीय वाढली असती.
२००९ मध्ये गुंतवणूकदाराला १०,००० रुपयांत विप्रोचे २०० शेअर्स मिळाले असते. त्यानंतरच्या काळात कंपनीनं आपल्या भागधारकांना तीन बोनस वेळा बोनस शेअर्सची भेट दिली. या बोनसमुळं या २०० शेअर्सची संख्या ८८८ पर्यंत वाढली असती.
काल, २ डिसेंबर २०२४ रोजी विप्रोच्या शेअरची किंमत ५८४.५५ रुपयांवर बंद झाली. विप्रोच्या ८८८ समभागांचं मूल्य आता ५,१९,०८० रुपये झालं आहे. हे मूल्य मूळ गुंतवणुकीच्या तुलनेत ५१.९ पट वाढ दाखवतं.
यातून दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद दिसून येते. दीर्घकाळात केवळ शेअरची किंमतच वाढते असं नाही तर बोनस इश्यूसारखे कंपन्यांनी घेतलेले निर्णय देखील संपत्ती निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. शेअर बाजारात संयमाचं फळ किती गोड असू शकतं याचं विप्रो कंपनी हे उत्तम उदाहरण आहे.
संबंधित बातम्या