Wipro Q2 results : दिवाळीच्या तोंडावर कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल येत आहेत. आयटी कंपन्यांनी निकालानंतर गुंतवणूकदारांना खूष करण्याचा धडाकाच लावला आहे. इन्फोसिसनं डिविडंड देण्याची घोषणा केल्यानंतर विप्रोनं दिवाळीआधीच धमाका केला आहे. कंपनीनं १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली आहे.
बेंगळुरूस्थित आयटी कंपनी विप्रोनं आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या सप्टेंबर अखेरच्या तिमाहीचे निकाल गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी जाहीर केले. विप्रोचा निव्वळ नफा २१ टक्क्यांनी वाढून ३,२०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल २२,३०२ कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील २२,५१६ कोटी रुपयांच्या तुलनेत आताचा महसूल किंचित कमी आहे. तिमाही निकालांबरोबरच कंपनीनं एकावर एक शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे.
विप्रोनं आतापर्यंत १३ वेळा बोनस शेअरचं वाटप केलं आहे. कंपनीनं २०१९ मध्ये शेवटचा बोनस १:३ या प्रमाणात जाहीर केला होता. त्याआधी २०१७ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली होती. २०१० मध्ये २:३ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली होती. २००५ (१:१) आणि २००४ (२:१) मध्ये बोनस शेअरची घोषणा केली. १९९७ मध्ये विप्रोने २:१ चा बोनस शेअर जाहीर केला. कंपनीनं १९९५ आणि १९९२ मध्ये १:१ बोनस समभाग जाहीर केले होते. गेल्या वर्षी कंपनीनं शेअर बायबॅक योजनाही आणली होती.
विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनी पल्लिया यांनी तिमाही निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. 'उत्तम परिचालनामुळं दुसऱ्या तिमाहीत कंपनीला महसूल वाढ, बुकिंग आणि नफ्याच्या बाबतीत आपल्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य झालं आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं बोनस शेअरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासाठी लवकरच रेकॉर्ड डेट निश्चित केली जाईल. कंपनीच्या पात्र भागधारकांना प्रत्येक २ रुपये अंकित मूल्याच्या शेअरसाठी एक शेअर दिला जाईल.
संबंधित बातम्या