raghuram rajan on viksit bharat : आताच्या परिस्थितीत विकसित भारताच्या गप्पा हा मूर्खपणा; रघुराम राजन यांचं सडेतोड मत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  raghuram rajan on viksit bharat : आताच्या परिस्थितीत विकसित भारताच्या गप्पा हा मूर्खपणा; रघुराम राजन यांचं सडेतोड मत

raghuram rajan on viksit bharat : आताच्या परिस्थितीत विकसित भारताच्या गप्पा हा मूर्खपणा; रघुराम राजन यांचं सडेतोड मत

Mar 26, 2024 06:13 PM IST

Raghuram Rajan on Indian Economy : २०४७ पर्यंत भारत विकसित अर्थव्यवस्था होईल हा प्रचार आहे. तो खरा होण्यासाठी प्रचंड कष्टाची गरज आहे, असं मत अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

आताच्या परिस्थितीत विकसित भारताच्या गप्पा हा मूर्खपणा; रघुराम राजन यांचं सडेतोड मत
आताच्या परिस्थितीत विकसित भारताच्या गप्पा हा मूर्खपणा; रघुराम राजन यांचं सडेतोड मत (PTI)

Raghuram Rajan on Indian GDP : ‘अनेक मुलं माध्यमिक शिक्षणापासून वंचित असताना आणि मुलांचं शाळा सोडण्याचं प्रमाण मोठं असताना २०४७ पर्यंत विकसित भारताच्या गप्पा मारणं हा मूर्खपणा आहे,’ असं परखड मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

‘ब्लूमबर्ग’शी बोलतांना रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. 'भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा प्रचार सध्या केला जात आहे. आकडे फुगवून सांगितले जात आहेत. लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा असं राजकारण्यानं वाटतं. मात्र, तसा विश्वास ठेवणं ही आपली मोठी चूक ठरेल. कारण आता जे बोललं जातंय, ते प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला आणखी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे,' असं राजन म्हणाले.

सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आश्वस्त केलं होतं. येत्या काही वर्षांत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असं पंतप्रधान मोदींनी अनेकदा सांगितलं आहे. तसंच, २०४७ पर्यंत भारत एक विकसित अर्थव्यवस्था होईल असंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजन यांचं मत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. '२०४७ पर्यंत भारत विकसित अर्थव्यवस्था होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

भारतासाठी चिंतेची बाब कोणती?

कोविड महामारीनंतर शाळकरी मुलांची शिकण्याची क्षमता २०१२ पूर्वीच्या पातळीपर्यंत घसरल्याचे अभ्यासातून दिसून आलं आहे, याकडं राजन यांनी लक्ष वेधलं आहे. भारतानं आपलं मनुष्यबळ अधिक रोजगारक्षम करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याकडं असलेल्या मनुष्यबळासाठी रोजगार निर्माण करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. 'आपल्याकडं मनुष्यबळाची कमतरता नाही. ते वाढतच आहे. परंतु ते योग्य ठिकाणी कार्यरत असेल तरच त्याचा फायदा होतो. मात्र, इथंच आपण कमी पडत आहोत ही शोकांतिका आहे, असं राजन म्हणाले.

सरकारचा भर हायप्रोफाइल प्रकल्पांवर

शिक्षण व्यवस्था दुरुस्त करण्याऐवजी चिप मॅन्युफॅक्चरिंगसारख्या हायप्रोफाईल प्रकल्पांवर सरकारचा भर आहे. 'महान राष्ट्र बनण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा खरी आहे, पण काय करायला हवं याकडं ते लक्ष देतात का, हा वेगळा प्रश्न आहे. आपण प्रतिष्ठेच्या प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे, ही चिंतेची बाब असल्याचं राजन म्हणाले.

भारत चीनकडून काय शिकू शकतो?

‘भारतानं चीनकडून काय शिकण्यासारखं आहे हे सांगताना राजन यांनी चीनचे माजी नेते डेंग शियाओपिंग यांचा हवाला दिला. 'मांजर काळी आहे की पांढरी हे महत्त्वाचं नाही, ती उंदीर पकडते की नाही हे महत्त्वाचं आहे. आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोनाची गरज आहे, असं राजन यांनी सांगितलं.

Whats_app_banner