मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund : एसआयपीतील गुंतवणूक दरवर्षी का वाढवावी? ही आहेत ५ कारणं

Mutual Fund : एसआयपीतील गुंतवणूक दरवर्षी का वाढवावी? ही आहेत ५ कारणं

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 25, 2024 12:20 PM IST

Mutual Fund SIP Inflow News : म्युच्युअल फंड काढून स्वस्थ न बसता वर्षागणिक त्यात गुंतवणूक वाढवायला हवी, असा सल्ला गुंतवणूकदार देतात. काय आहेत त्याची कारणं? वाचा…

Mutual Fund SIP
Mutual Fund SIP

Mutual Fund SIP : म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. एसआयपीतील एकूण गुंतवणूक डिसेंबर २०२३ मध्ये ९.९५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही आकडेवारी पूर्वीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे, असं एएमएफआयच्या आकडेवारीवरून दिसून येते.

एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची अनेक कारणं आहेत. नव्या गुंतवणूकदारांचं आगमन हे त्याचं एक मोठं कारण आहे. चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरच्या तिमाहीत १.०६ कोटी नवीन एसआयपी करण्यात आल्या आहेत. जूनच्या तिमाहीतील एसआयीपीच्या तुलनेत हा आकडा ४७ टक्के जास्त आहे.

दुसरं कारण म्हणजे, सध्याचे गुंतवणूकदार विविध क्षेत्रे, योजना आणि बाजार भांडवलातील आपली वाढवण्यासाठी दरवर्षी एसआयपीच्या गुंतवणुकीत वाढ करत आहेत. हा एक सकारात्मक कल असून बाजारातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी त्यांचे एसआयपी वाढवले पाहिजेत, असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांनी दिला आहे.

Republic Day Sale : टीव्हीपासून स्पीकरपर्यंत सर्व काही स्वस्त; सोनीच्या सेलमध्ये सवलतींचा वर्षाव

उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत नाही हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलंय. त्यामुळं जास्तीचं उत्पन्न (उत्पन्नात वाढ - खर्चात वाढ) शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतविण्याचा सल्ला दिला जातो. एसआयपीचा ओघ वाढण्याचं हेही एक कारण मानलं जातं, असं वेल्थ लॅडर डायरेक्टचे संस्थापक श्रीधरन एस सांगतात. 

एसआयपीतील गुंतवणूक दरवर्षी का वाढवावी?

तेजीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी…

२०२३ मध्ये निफ्टी ५० नं जवळपास २० टक्के परतावा दिला, तर सेन्सेक्सचे शेअर्स जवळपास १८ टक्क्यांनी वधारले. याचा अर्थ, ब्ल्यू-चिप शेअर्सची किंमत आता वर्षभरापूर्वीच्या किमतीपेक्षा १८ ते २० टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळं आताही तुम्ही मागील वर्षाइतकेच म्युच्युअल फंड युनिट्स विकत घेतल्यास तेवढीच खरेदी करण्यासाठी तुम्हाला १८ ते २० टक्के जास्त रक्कम खर्च करावी लागणार आहे. 

महागाईशी लढण्यासाठी… 

गुंतवणूक ही मध्यम मुदतीची आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी असते, मात्र उद्दिष्ट निश्चिती अगोदरच केली जात असल्यानं भविष्यातील महागाईच्या परिणामाचा अंदाज आधीच बांधणं अव्यवहार्य ठरतं. त्यामुळंच आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एसआयपीतील गुंतवणूक वर्षानुवर्षे वाढवत राहणं आवश्यक आहे. 

जास्त उत्पन्न, जास्त बचत

उत्पन्न वाढले की खर्चही वाढतो, मात्र खर्च त्याच वेगानं वाढत नाही. अशा वेळी किरकोळ खर्च करण्याऐवजी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढवणं श्रेयस्कर ठरतं. 

IPO News : आयपीओ येण्याआधीच शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, आहे कोणती ही कंपनी?

जोखीम घेण्याची क्षमता वाढते!

कुठलाही गुंतवणूकदार सुरुवातीला भीत-भीत, अंदाज घेत गुंतवणूक करतो. कालांतरानं फायदा झाल्यानंतर आणि काहीसा अनुभव गाठीशी आल्यानंतर जोखीम घेण्याची मानसिकता तयार होते. त्यातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढते. त्याही पुढं जाऊन इक्विटीमध्ये अधिक गुंतवणूक करता येते. याउलट, जोखीम घेण्याची क्षमता कमी असलेले गुंतवणूकदार ब्लू चिप आणि डेट फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. जास्त जोखीम घेण्याची क्षमता असलेले गुंतवणूकदार स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. 

संधींचा लाभ घ्या!

बाजारात तेजी असते तेव्हा तिचा लाभ घेण्यासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवली जाऊ शकते. मात्र, वर्षागणिक हळूहळू गुंतवणुकीत वाढ केली असेल तरच याचा चांगला फायदा मिळतो.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त माहितीपर आहे. हा कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीचा निर्णय आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग