maternity insurance : भारतात बाळंतपणाशी संबंधित वाढत्या खर्चामुळे मातृत्व विमा देणाऱ्या योजनांमध्ये लोकांचा रस वाढत आहे. मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेण्याआधी प्रत्यक्ष आयुष्यातील आव्हानांचा विचार करणं आवश्यक आहे. ही आव्हानं पेलण्याची आपली तयारी आहे का याचाही विचार व्हायला हवा. मातृत्व विमा हा या प्रक्रियेत आधारस्तंभ ठरू शकतो. हा विमा होणारी आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्यात खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
विमा कंपन्या महिलांच्या बदलत्या गरजा देखील समजून घेत आहेत. या शिक्षण, करिअरची प्रगती आणि बाळंतपणास उशीर यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर व्यापक कव्हरेजसह अनेक प्रसूती विमा योजना सुरू होत आहेत. अनेक आघाडीच्या विमा कंपन्यांनी प्रसूती कव्हरेजसाठी प्रतीक्षा कालावधी २ ते ३ वर्षांवरून ९ ते १२ महिन्यांवर आणला आहे. त्यामुळं गर्भधारणेदरम्यान आर्थिक मदत तातडीनं मिळणं शक्य झालं आहे.
विमा कंपन्या अनेक पर्याय देत असताना ग्राहकांनीही फॅमिली प्लानिंग करताना मातृत्व कवच खरेदीचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे.
मुलांना जन्म देण्याचा निर्णय हा निःसंशयपणे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. त्यासोबत आर्थिक गोष्टीही आपोआपच येतात. विमा संरक्षण असल्यास जन्माआधीच्या काळजीपासून बाळंतपण आणि प्रसूतीनंतरच्या देखभालीपर्यंत सर्व खर्च त्वरीत जमा होऊ शकतो. योग्य विमा संरक्षण नसल्यास या खर्चाचा बोजा कुटुंबावर पडतो. त्यामुळं आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
मातृत्व आरोग्य विमा योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकांना योजनेचा प्रतीक्षा कालावधी पूर्ण करणं आवश्यक असतं. भारतात हा वेटिंग पीरियड ९ महिने ते ४ वर्षांपर्यंत असू शकतो. पुढील २ ते ३ वर्षांत कुटुंब सुरू करण्याची योजना आखत असलेल्या व्यक्तींसाठी गरजेनुसार सर्व लाभ पूर्णपणे उपलब्ध आहेत. याची खात्री करण्यासाठी मातृत्व आरोग्य विमा योजना आधीच घेण्याचा सल्ला दिला जातो.
याशिवाय, ग्राहकांना अज्ञात जोडीदारासह पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय आहे. लग्नानंतर जोडीदाराचं नाव जोडलं जाऊ शकतं, पॉलिसी खरेदीच्या तारखेपासून प्रतीक्षा कालावधी मोजला जाऊ शकतो.
हेही वाचा: अदानीच्या 'या' पावरफुल शेअरनं रचला नवा विक्रम; अवघ्या १५ महिन्यांत तब्बल ३६३ टक्के वाढ
संपूर्ण काळजीसाठी व्यापक कव्हरेज
अशा कव्हरेजमध्ये केवळ सर्व आवश्यक वैद्यकीय खर्चांचा समावेश नसतो तर गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या पलीकडे प्रसूतीनंतरच्या खर्चाचा समावेश होतो. ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आरोग्य विमा विकसित होत असताना, बऱ्याच योजना आता जास्तीच्या सुविधा देतात.
मातृत्वासाठी हल्ली अनेक उपाय केले जातात. प्रत्येक व्यक्तिगणिक ते वेगळे असतात. ही विविधता समजून घेऊन, बऱ्याच विमा योजनांमध्ये आता इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि वंध्यत्वावरील उपचारांसारख्या सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाचा खर्चही समाविष्ट आहे. याशिवाय सरोगसी करणाऱ्या जोडप्यांसाठी, या योजना केवळ इच्छित पालकांनाच नव्हे तर सरोगेट आणि तिच्या प्रसूतीचा खर्चही देतात. दत्तक घेण्याचा पर्याय निवडणाऱ्यांना संबंधित कायदेशीर कारवाईसाठी आर्थिक पाठबळ मिळते.
शिवाय, वैद्यकीय कारणास्तव गर्भपात करण्याची आवश्यकता असल्यास, या योजना संबंधित खर्चासाठी सुरक्षा कवच देतात. तथापि, शेवटच्या क्षणी घाईगडबडीत आणि संभाव्य अयोग्य निर्णय घेणे टाळण्यासाठी या निर्णयांचं आधीच नियोजन करणं महत्त्वाचं आहे.
वाढत्या आरोग्यसेवेच्या खर्चाच्या युगात मातृत्व विमा ही भविष्यातील एक समजूतदार आणि महत्त्वाची गुंतवणूक ठरते. बाळंतपणाचा आर्थिक भार कमी करून या विमा योजना कुटुंबांना संभाव्य आर्थिक संकटापासून वाचवतात. नवजात मुलांच्या गरजा भागविण्यास सक्षम करते.