Share Market : केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाली. तेल आणि नैसर्गिक वायू, मेटल्स आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील (FMCG) कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१९.२२ अंकांनी घसरून ७७,१८६.७४ अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी १२१.१० अंकांनी घसरून २३३६१.०५ अंकांवर बंद झाला.
केंद्रीय अर्थसंकल्प हा तसा समतोल साधणारा व मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे असं सार्वत्रिक मत आहे. १२.७५ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना शून्य प्राप्तिकर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) कस्टमाइज्ड क्रेडिट कार्डसह वाढीव क्रेडिट गॅरंटी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) ३५ अतिरिक्त भांडवली वस्तूंसाठी सीमा शुल्कात सूट, जागतिक क्षमता केंद्रांना (GCC) प्रोत्साहन, सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद ही अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. असंही असतानाही बाजार का घसरला? जाणून घेऊया…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के, तसेच चीनवर १० टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. त्यातून आगामी व्यापारयुद्ध भडकण्याची भीती गुंतवणूकदारांना आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झआला. शिवाय, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरून ८७.२९ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
परदेशी गुंतवणूकदारही अलीकडं विक्रेते झाले आहेत. एनएसईच्या आकडेवारीनुसार, १ फेब्रुवारी रोजी त्यांनी १३२७.०९ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीच्या (MPC) ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या बैठकीच्या आधीची सावधगिरी म्हणून देखील विक्रीचा जोर वाढला आहे.
सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचा शेअर सर्वाधिक ४.६४ टक्क्यांनी घसरून ३२८७.२५ रुपयांवर बंद झाला. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स लिमिटेड २.६४ टक्क्यांनी, ६८७.४५ रुपयांवर आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड २.६२ टक्क्यांनी घसरून २,४४१.४० रुपयांवर व्यवहार करत होता.
क्षेत्रानिहाय विचार केला तर निफ्टी तेल आणि वायू निर्देशांक सर्वाधिक २.२२ टक्क्यांनी घसरून १०,२०६.२५ वर, निफ्टी मेटल १.७३ टक्क्यांनी घसरून ८,१५५.१५ वर आणि निफ्टी एफएमसीजी १.६७ टक्क्यांनी घसरून ५७,४१९.५५ वर बंद झाला.
सेन्सेक्समधील शेअर्सपैकी बजाज फायनान्स लिमिटेडचा शेअर सर्वाधिक ५.२८ टक्क्यांनी वधारला आणि ८४२३.८० रुपयांवर बंद झाला. त्याखालोखाल महिंद्रा अँड महिंद्रा २.९६ टक्क्यांनी वधारून ३,१७१.३५ रुपयांवर आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेड २.३० टक्क्यांनी वधारून १७९४.४५ रुपयांवर बंद झाला.
निफ्टी सेक्टोरल इंडेक्समध्ये निफ्टी आयटी सर्वाधिक ०.६८ टक्क्यांनी वधारून ४२,३१४.२५ वर, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स ०.५५ टक्क्यांनी वधारून ३८,९१८.३० वर आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स-बँक ०.४७ टक्क्यांनी वधारून २५,१९०.५० वर बंद झाला.
संबंधित बातम्या