Stock Market udpates : रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडचे शेअर्स सतत चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा या शेअरची चर्चा सुरू आहे. हा शेअर सातत्यानं वधारत असून आज तब्बल १२ टक्क्यांनी वधारून हा शेअर १२.२९ रुपयांवर पोहोचला. कंपनीनं केलेला एक करार या तेजीचं कारण ठरला आहे.
रामा स्टील ट्यूब्सनं सौर प्रकल्पांसाठी स्टील स्ट्रक्चर आणि सिंगल-अॅक्सिस ट्रॅकर्स पुरवठ्यासाठी ओनिक्स रिन्यूएबल लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे आणि भविष्यात दुहेरी-अॅक्सिस ट्रॅकर्समध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे.
हरित ऊर्जा क्षेत्रात प्रवेशाची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. विश्वासार्हता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेचा उच्च दर्जा सुनिश्चित करणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलर ग्रीनफिल्ड प्रकल्पांच्या दीर्घकालीन यशासाठी हे महत्त्वपूर्ण आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.
राम स्टील ट्यूब्सचे सीईओ रिची बन्सल यांनी या कराराचं महत्त्व अधोरेखित केलं. 'या सहकार्य करारामुळं आमच्या कंपनीच्या महसुलावर (EBIDTA) सकारात्मक परिणाम होईल. शिवाय, अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात कंपनीचा ठसा उमटवण्यात आम्हाला मदत होईल, असं ते म्हणाले. सौर प्रकल्पांची विश्वासार्हता आणि आयुष्य स्टील स्ट्रक्चर्सच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. प्रकल्पांचं दीर्घकालीन यश आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात या गोष्टी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ओनिक्स रिन्यूएबल लिमिटेडसोबतच्या धोरणात्मक सहकार्याचा उद्देश सौर ऊर्जा क्षेत्राला उच्च-गुणवत्तेची उत्पादनं पुरवणं हा आहे, असं बन्सल म्हणाले.
कंपनीच्या जून तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रवर्तकांकडे सध्या ५६.३३ टक्के हिस्सा आहे. मार्च २०२४ मधील ५६.७ टक्के हिस्स्यापेक्षा सध्याचा आकडा किंचित कमी आहे. रामा स्टील ट्यूब्सचे शेअर चालू कॅलेंडर वर्षात सुमारे ४ टक्क्यांनी आणि मागील वर्षभरात १० पेक्षा जास्त टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांत या शेअरमध्ये १४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.