Explained : रेल्वे कंपन्यांचे शेअर रॉकेटच्या वेगानं का धावतायत? हे आहे कारण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Explained : रेल्वे कंपन्यांचे शेअर रॉकेटच्या वेगानं का धावतायत? हे आहे कारण

Explained : रेल्वे कंपन्यांचे शेअर रॉकेटच्या वेगानं का धावतायत? हे आहे कारण

Updated Jul 08, 2024 04:05 PM IST

Railway stocks skyrocketing : रेल्वेशी संबंधित सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. बाजार पडत असताना हे का घडलं? जाणून घेऊया…

Explained : रेल्वे कंपन्यांचे शेअर रॉकेटच्या वेगानं का धावतायत? हे आहे कारण
Explained : रेल्वे कंपन्यांचे शेअर रॉकेटच्या वेगानं का धावतायत? हे आहे कारण (Photo: Pixabay)

Railway stocks share price : शेअर बाजारात आज (सोमवार) घसरण झाली असली तरी रेल्वे कंपन्यांचे शेअरच्या बाबतीत वेगळं चित्र दिसलं. इरकॉन इंटरनॅशनल (IRCON), रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) या भारतीय रेल्वे प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार तेजी दिसून आली.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चा शेअर जवळपास २ टक्क्यांनी वाढला. आरव्हीएनएलच्या शेअरच्या किमतीनं १५ टक्क्यांहून अधिक वाढीसह नवा उच्चांक गाठला, तर आयआरएफसीच्या शेअरची किंमत २०६ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचली आणि इंट्राडे मध्ये सुमारे ९ टक्के वाढ नोंदवली. एनएसईवर इरकॉनच्या शेअरच्या भावानंही ३३४.५० चा नवा विक्रमी उच्चांक गाठला असून, सोमवारी त्यात ७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली.

रेल्वे मंत्र्यांची घोषणा कारणीभूत

शेअर बाजारातील जाणकारांच्या मते, सेन्सेक्स नकारात्मक असूनही सोमवारी रेल्वे शेअर्समध्ये तेजी दिसून आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २५०० नवीन सामान्य प्रवासी डबे आणि १ हजार जादा डब्यांची योजना जाहीर केली आहे हे याचं मुख्य कारण आहे. ५० नवीन अमृत भारत ट्रेनची निर्मिती, हायस्पीड आणि लक्झरी ट्रेन सेवा सुरू करण्याच्या वैष्णव यांच्या घोषणेमुळंही रेल्वेच्या स्टॉक्समध्ये वाढ झाली आहे. याशिवाय, केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केली जाण्याची अपेक्षा या वाढीला चालना देत आहे.

रेल्वे कंपन्यांच्या शेअरला चालना देणारे घटक

बसव कॅपिटलचे संस्थापक संदीप पांडे म्हणाले, 'रेल्वेमंत्र्यांची घोषणा हे शेअरमधील वाढीचं मुख्य कारण आहे. त्यांनी ५० नवीन अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीचा शुभारंभ केल्यामुळं रेल्वेच्या शेअर्सची सोमवारी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यातून या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. भारतीय रेल्वे कंपन्या भांडवली खर्चात वाढ करत आहेत. त्यामुळं त्यांचा व्यवसाय विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळंच सध्या किंमती वाढूनही गुंतवणूकदार हे शेअर खरेदी करत आहेत.

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर म्हणाले, 'नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे मंत्र्यांनी पुढील पाच वर्षांत तीन हजार नव्या गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. यामुळे २३ जुलै २०२४ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत. केंद्र सरकारनं २०१४ पासून पायाभूत सुविधांवर सातत्यानं लक्ष केंद्रित केलं आहे. साहजिकच ऊर्जा, ऊर्जा, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या अनुषंगानं विकासाभिमुख अर्थसंकल्पाची बाजारपेठ आतुरतेनं वाट पाहत आहे. त्याचं प्रतिबिंब रेल्वे कंपन्यांच्या शेअरच्या वाढीत उमटत आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखातील तज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मते ही त्यांची स्वतःची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. ही केवळ शेअर्सच्या कामगिरीची माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner