Economic Survey 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी, आज देशाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला. या सर्वेक्षण अहवालातून देशाच्या आर्थिक स्थितीची वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आहे. महागाईच्या मुद्द्यावर अहवालात सविस्तर विवेचन करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांत वाढलेले कांदा व टोमॅटोच्या दराचं कारणही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
आर्थिक वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये कृषी क्षेत्रावर प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला. जलाशयांची पातळी कमी झाली आणि पिकांचं नुकसान झालं. त्याचा थेट फटका शेती उत्पादनाला बसला आणि अन्नधान्याच्या किंमतींवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळं ग्राहक अन्न मूल्य निर्देशांकावर (सीएफपीआय) आधारित अन्न महागाई आर्थिक वर्ष २०२२ मधील ३.८ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६.६ टक्क्यांवर आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, असं आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे. प्रतिकूल हवामानामुळे भाजीपाला आणि डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला. टोमॅटो आणि कांद्याच्या किंमती वाढण्यामागेही हेच कारण आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
गेल्या दोन वर्षांत अन्नधान्य महागाई ही जागतिक घटना बनली आहे आणि हवामान बदलामुळं अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम होत आहे. जुलै २०२३ मध्ये ऋतुमानातील बदल, पिकांवर पडणारे वेगवेगळे रोग उदा. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, मान्सूनच्या पावसाचे लवकर आगमन आणि अतिवृष्टीमुळे तुरळक भागातील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं टोमॅटोच्या दरात वाढ झाली, असं अहवालात म्हटलं आहे.
कांद्याच्या दरातील वाढीमागे देखील बऱ्याच अंशी निसर्ग जबाबदार असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे. मागील हंगामात झालेला पाऊस, पेरणीला होणारा उशीर, लांबलेला कोरडा पाऊस आणि इतर देशांच्या व्यापाराशी संबंधित नियम बदलांचा फटका कांद्याच्या दराला बसला.
गेल्या दोन वर्षांत कमी उत्पादन आणि प्रतिकूल हवामानामुळे डाळींचे विशेषत: तुरीचे भाव वाढले आहेत. रब्बी हंगामातील संथ पेरणी प्रगती आणि दक्षिणेकडील राज्यांमधील हवामानातील बदलांमुळे उडीद उत्पादनावर परिणाम झाला.
संबंधित बातम्या