मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market in March : दरवर्षी मार्च महिन्यात का गडगडतो शेअर बाजार?; वाचा

Share Market in March : दरवर्षी मार्च महिन्यात का गडगडतो शेअर बाजार?; वाचा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 14, 2024 06:08 PM IST

Share Market in march : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये शेअर बाजार का घसरतो? जाणून घेऊया कारणं…

दरवर्षी मार्च महिन्यात का गडगडतो शेअर बाजार?; वाचा
दरवर्षी मार्च महिन्यात का गडगडतो शेअर बाजार?; वाचा

Share Market in March : मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. अर्थात, मार्च महिन्यातील ही घसरण अनुभवी गुंतवणूकदारांसाठी नवीन नाही. वर्षातील इतर कोणत्याही महिन्यापेक्षा मार्च महिन्यात शेअर बाजार गडगडतो असा अनुभव आहे. मागच्या २३ वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तरी हे लक्षात येईल. या कालावधीत बाजारानं ५६ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मार्च महिन्यातील घसरण हा निव्वळ योगायोग नसून त्यामागे काही ठोस कारणं आहेत.

जाणून घेऊया ही कारणं…

कॅश इज किंग

बिझनेसमध्ये रोख रक्कम अर्थात कॅश बॅलन्स हे सगळ्या संकटावरचं औषध असतं. त्यामुळं प्रत्येक कंपनी आपल्या ताळेबंदात पुरेशी रोख रक्कम राखण्यास प्राधान्य देते. मार्च महिन्यात हे ताळेबंद बनत असतात. अशावेळी ताळेबंदात ‘रिस्की’ समजले जाणारे शेअर दाखवण्यापेक्षा ते विकून कॅश दाखवण्यावर भर दिला जातो. त्यामुळं साहजिकच कंपन्या आपले अनेक शेअर विकतात. त्यामुळं बाजार घसरतो. InvestSavvy PMS चे सीईओ आशिष गोयल म्हणतात, 'कंपन्या शेअर विकतात, वर्षाच्या शेवटी ताळेबंदात नफा दाखवतात आणि नवीन आर्थिक वर्षात पुन्हा नव्यानं गुंतवणूक करतात.

अ‍ॅडव्हान्स टॅक्स

चालू आर्थिक वर्षाचा आगाऊ कर (Advance Tax) जमा करण्याची शेवटची तारीख १५ मार्च आहे. आगाऊ कर हा तिमाही आधारावर हप्त्यांमध्ये भरला जातो. शेवटच्या तिमाहीचा हप्ता कंपन्या आणि इतर लोक मार्चमध्ये भरतात. ही रक्कम उभारण्यासाठी शेअर किंवा म्युच्युअल फंड विकले जाऊ शकतात.

नफा/तोटा वसुली

मार्च महिन्यात कंपन्या नफा-तोट्यावर लक्ष ठेवून असतात. जर एखाद्याला वर्षभरात बाजारात मोठा नफा झाला असेल आणि दुसरीकडं त्याच्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉकमध्ये दीर्घकालीन तोटा दिसत असेल, तर ते शेअर विकून होणाऱ्या तोट्याची दीर्घकालीन भांडवली नफ्याद्वारे भरपाई केली जाते. त्यातून कर दायित्व कमी होते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याला वर्षभरात तोटा झाला असेल, तर नफ्यात असलेले शेअर काढून पुढील वर्षी पुन्हा नव्या जोमानं मार्केटमध्ये एन्ट्री केली जाते. या सगळ्यामुळं बाजारातील अस्थिरता वाढते आणि शेअरचे भाव घसरतात.

WhatsApp channel