Rise in Indian stock market : भारतीय शेअर बाजारात गुरुवार, २३ मे रोजी जोरदार खरेदीचा उत्साह दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नव्या विक्रमी उच्चांकी पातळीवर झेप घेतली. निफ्टी १.६६ टक्क्यांनी वधारून २२,९७० वर पोहोचला तर, सेन्सेक्स १.६३ टक्क्यांनी वधारून ७५४२५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
मागच्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ही तेजी दिसून येत आहे. त्यामुळं गुंतवणूकदारही काही प्रमाणात गोंधळून गेले आहेत. प्रॉफिट बुक करावं की आणखी काही काळ थांबावं असा विचार अनेकांच्या मनात आहे. शेअर बाजारातील या तेजीला पाच प्रमुख घटक कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
भारतीय बाजारातील सध्याच्या तेजीला आणि खरेदीच्या सपाट्याला लोकसभा निवडणुकीचा काहीसा अपेक्षित निकाल कारण असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बाजाराला राजकीय स्थैर्याची अपेक्षा आहे. त्यामुळं गुंतवणूकदार दर्जेदार शेअर्सच्या खरेदीवर भर देत आहेत.
निफ्टीनं नवा विक्रम गाठणं हा निवडणुकीनंतरच्या संभाव्य राजकीय स्थैर्याचं सूचन आहे. ही तेजी तकलादू नाही. कारण, लार्ज कॅपमधील शेअर्सची वाढ होत आहे,' असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितलं.
विख्यात शेअर विश्लेषक बर्नस्टीन यांच्या मते, भारतीय शेअर बाजारात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा निकालानंतरच्या आठवड्यात अल्पकालीन तेजी दिसू शकते. या काळात निफ्टी २३००० चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. मात्र, या अल्पकालीन तेजीनंतर प्रॉफिट बुकिंग होऊ शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) आर्थिक वर्ष २०२४ साठी केंद्राला विक्रमी २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केल्यानंतर बाजाराच्या भावनेला चालना मिळाल्याचं दिसत आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे, कारण यामुळं सरकारला आर्थिक वर्ष २०२५ साठी वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होईल आणि पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवता येईल.
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण ही बाजारात सकारात्मकतेला चालना देणारी आहे, विशेषत: जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदारांपैकी एक असलेल्या भारताच्या हे पथ्यावर पडलं आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं महागाई नियंत्रणात येण्यास मदत होते आणि देशाच्या वित्तीय आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
रिझर्व्ह बँकेनं सरकारला मेगा डिव्हिडंड दिल्यानंतर भारताच्या १० वर्षांच्या रोखे उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकातील तेजीमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेसह बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या समभागांनी सर्वाधिक हातभार लावला आहे.
'सरकारकडून कमी कर्ज घेतल्यानं रोखे उत्पन्नात झपाट्यानं घट झाली आहे. बाँड यील्डमधील घट बँकिंग शेअर्ससाठी सकारात्मक आहे,' असं विजयकुमार यांनी सांगितलं. गुरुवारी इंट्राडे व्यवहारात निफ्टी बँकेच्या निर्देशांकात जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली.
या महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढता पाय घेतला असला तरी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) भारतीय बाजारात जोरदार खरेदी करीत आहेत. आकडेवारीनुसार, डीआयआयनं २२ मेपर्यंत कॅश सेगमेंटमध्ये ३८,३३१ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले. दुसरीकडं, एफआयआयनं या महिन्यात आतापर्यंत ३८,१८६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.
जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या इक्विटी डेरिव्हेटिव्ह रिसर्चच्या सहाय्यक उपाध्यक्ष सोनी पटनायक यांनी सांगितलं की, निफ्टीनं आज साप्ताहिक एक्सपायरीवर २२८००+ ची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली आणि सध्याच्या पातळीवरून महिन्याच्या अखेरीस तो २३००० चा टप्पा गाठू शकतो.
(डिस्क्लेमर: वरील मतं आणि शिफारसी विश्लेषक, तज्ञ आणि ब्रोकरेज फर्मची व्यक्तिगत मतं आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)