Infosys Share : तिमाही नफा वाढूनही इन्फोसिसच्या शेअरमध्ये का होतेय घसरण? हे आहे कारण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infosys Share : तिमाही नफा वाढूनही इन्फोसिसच्या शेअरमध्ये का होतेय घसरण? हे आहे कारण

Infosys Share : तिमाही नफा वाढूनही इन्फोसिसच्या शेअरमध्ये का होतेय घसरण? हे आहे कारण

Jan 17, 2025 10:47 AM IST

Infosys Share Price : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसचा निव्वळ नफा तिसऱ्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

Infosys Share : तिमाही नफा वाढूनही इन्फोसिसच्या शेअरमध्ये का होतेय घसरण? हे आहे कारण
Infosys Share : तिमाही नफा वाढूनही इन्फोसिसच्या शेअरमध्ये का होतेय घसरण? हे आहे कारण (PTI)

Infosys Q3 Results : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली आहे. डिसेंबर अखेरच्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ होऊनही कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NYSE) सूचीबद्ध असलेल्या इन्फोसिसच्या अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्टमध्ये (ADR) झालेली घसरण यास कारणीभूत आहे.

इन्फोसिसच्या तिसऱ्या तिमाहीतील निकालानंतर इन्फोसिसचा एडीआर गुरुवारी ५.७७ टक्क्यांनी घसरून २१.५७ डॉलरवर बंद झाला. त्यामुळं इन्फोसिसच्या शेअरच्या किंमतीत घसरण होत आहे. सकाळी ११ वाजता बीएसईवर इन्फोसिसचा शेअर ६.०१ टक्क्यांनी घसरून १,८१२.५५ रुपयांपर्यंत खाली आला.

अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स (ADR) हे अमेरिकन कंपन्यांच्या नियमित शेअर्सप्रमाणेच परदेशी कंपन्यांसाठी अमेरिकन शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी एक साधन आहे. तसंच, एडीआर हे अमेरिकन बँकेनं जारी केलेल्या विशेष प्रमाणपत्रासारखंच आहे.

इन्फोसिस एडीआरच्या किंमती घसरल्यामुळं तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही एनवायएसईवर विक्रीचा मोठा दबाव दिसून आला. यामुळं अमेरिकन गुंतवणूकदारांनी इन्फोसिसच्या तिसऱ्या तिमाही निकाला फारसं महत्त्व दिलं नाही. त्याचंच प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारातील सकाळच्या व्यवहारात उमटलं आहे, असं लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी सांगितलं.

किती वाढला इन्फोसिसचा नफा?

इन्फोसिसचा निव्वळ नफा डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत ४.६ टक्क्यांनी वाढून ६८०६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत आयटी कंपनीचा महसूल ४०,९८६ कोटी रुपयांवरून २ टक्क्यांनी वाढून ४१,७६४ कोटी रुपये झाला आहे. अमेरिकन डॉलरचं उत्पन्न ४,९३९ दशलक्ष डॉलर होतं, तर स्थिर चलनाच्या दृष्टीनं तिमाही दर तिमाही महसुली वाढ १.७ टक्के होती. ईबीआयटी ३ टक्क्यांनी वाढून ८,९१२ कोटी रुपये झाला, तर ईबीआयटी मार्जिन तिमाही-दर-तिमाही २० बीपीएसनं वाढून २१.३ टक्के झालं.

शेअर खरेदी करावा का?

एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक दिपेशकुमार मेहता यांच्या मते, इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली महसूल वाढ नोंदविली आहे. इतर उद्योगांमध्ये मागणी स्थिर आहे. इन्फोसिसनं सलग तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वर्ष २०२५ च्या महसुली वाढीचा अंदाज ४.५-५ टक्क्यांपर्यंत (३.७५-४.५ टक्के) वाढवला आहे. एमके ग्लोबलनं इन्फोसिसच्या समभागांवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलं असून टार्गेट प्राइस २,१५० रुपये ठेवली आहे. 

स्टोक्सबॉक्सचे रिसर्च अ‍ॅनालिस्ट सागर शेट्टी म्हणाले की, इन्फोसिसनं आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत सर्व आघाड्यांवर चांगली आर्थिक स्थिती नोंदवली आहे. कॅश फ्लो मॅनेजमेंटवर भर दिल्यानं आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत फ्री कॅश फ्लो आर्थिक वर्ष २०२४ पेक्षा जास्त झाला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner