gold silver price today 16 July 2024 : लग्नसराईचा हंगाम संपताच सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ७३ हजार रुपयांच्याही पुढं गेला आहे. चांदीच्या भावात मात्र किंचित घसरण होऊन तो ९१८०२ रुपयांवर आला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जारी केलेल्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव १९९ रुपयांनी वाढून ७३१३१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, २३ कॅरेट सोन्याचा भाव १९८ रुपयांनी वाढून ७२,८३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव १८२ रुपयांनी वाढून ६६,९८८ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १४९ रुपयांनी वाढून ५४,८४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, १४ कॅरेट सोन्याचा भाव ११७ रुपयांनी वाढून ४२,७८२ रुपये झाला आहे. चांदी तब्बल ३३ रुपयांनी घसरली आहे.
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, आपण चलनवाढीच्या दिशेनं वाटचाल करीत आहोत, असं मत अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केलं आहे. हे सांगताना त्यांनी अलीकडच्या आकडेवारीचा आधार घेतला आहे. या वर्षी मध्यवर्ती बँकांनी केलेल्या सोने खरेदीचाही किंमतींवर परिणाम झाला झाला आहे. सिटी सिटीच्या विश्लेषकांच्या मते, आर्थिक प्रवाहात लक्षणीय वाढ झाल्यामुळं सोन्याचे दर ३,००० डॉलर प्रति औंसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ने सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवत नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काही बाबतीत सावधगिरी बाळगतानाच गुंतवणूकदारांनी निवडक मोठ्या शेअर्सच्या केलेल्या खरेदीमुळे बाजार वरच्या दिशेनं जाण्यास मदत झाली. सेन्सेक्सनं आज ८०,८९८.३ आणि निफ्टीनं २४,६६१.२५ चा नवा उच्चांक गाठला.
दिवसअखेर सेन्सेक्स आज ५२ अंकांनी वधारून ८०७१६.५५ वर बंद झाला, तर निफ्टी २६ अंकांनी वधारून २४,६१३ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांसाठी हा नवा उच्चांक होता.