China Gold Purchase : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती झपाट्यानं वाढत आहेत. मागच्या दीड महिन्यात सोन्यानं महागाईचा उच्चांक गाठला आहे. लगीनसराई आणि जागतिक घडामोडी यास कारणीभूत असल्याचं सांगितलं जात असलं तरी यामागं एक वेगळंच कारण असल्याचं समोर आलं आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींमागे चीन असल्याचं समोर आलं आहे. पृथ्वीवरील सोन्याचा साठा जणू संपणार असल्याप्रमाणे चीन सोनं खरेदी करत आहे.
भू-राजकीय आणि आर्थिक अशांततेच्या काळात सोन्याच्या किमती अनेकदा गगनाला भिडतात. कारण, ती सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. रशियानं युक्रेनवर केलेलं आक्रमण आणि गाझा युद्धाचा परिणाम सोन्याच्या महागाईवर झाला आहे.
चिनी नागरिकांनी आपला मोर्चा सोने खरेदीकडं वळवला आहे. त्यामुळं सोन्याचा भाव बराच काळ २४०० डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकावर आहे. रिअल इस्टेट व शेअर बाजारातील गुंतवणुकीवरचा त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेनं देखील अमेरिकेच्या कर्जाचा भार कमी करताना सोन्याच्या साठ्यात सातत्यानं वाढ केली आहे.
सोन्याच्या बाजारपेठेत चीनचं आधीपासूनच वर्चस्व आहे. २०२२ च्या अखेरीपासून सोन्याच्या जागतिक किमतीत जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चढे व्याजदर आणि डॉलरची उसळी यांसारख्या कारणांमुळं सोन्यातील गुंतवणूक कमी होणं अपेक्षित आहे. असं असतानाही सोन्यानं नवीन उच्चांक गाठणं सुरूच ठेवलं आहे.
गेल्या महिन्यात यूएस फेडरल रिझर्व्हनं दीर्घकाळ उच्च व्याजदर कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला. सोन्याचे भाव वाढू लागले, तर या वर्षी जगातील जवळपास सर्व प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलरचं मूल्य वाढलं आहे.
आता किंमती सुमारे २,३०० डॉलर प्रति औंसवर आल्यानं, सोन्याचा बाजार आता आर्थिक घटकांवर आधारित नसून चिनी खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या लहरींवर चालतो अशी भावना वाढत आहे. सोन्याच्या किंमती वाढण्यामागे चीन हा निर्विवादपणे एक प्रमुख घटक आहे, असं लंडनस्थित मेटल्सडेलीचे सीईओ रॉस नॉर्मन यांचं म्हणणं आहे.
चायना गोल्ड असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत चीनमध्ये सोन्याचा वापर ६ टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी सोन्याच्या भावात ९ टक्के वाढ झाली होती. त्यानंतरही वाढ सुरूच आहे. पारंपरिक गुंतवणुकीवरील विश्वास डळमळीत झाल्यानं सोनं अधिक आकर्षक झालं आहे. चीनमधील बांधकाम व्यवसाय संकटात आहे. सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या चिनी फंडांमध्ये खूप पैसा आला आहे.
चीनची केंद्रीय बँक ही सोन्याची आणखी एक मोठी खरेदीदार आहे. मार्चमध्ये पीपल्स बँक ऑफ चायनानं सलग १७ व्या महिन्यात सोन्याचा साठा वाढवला. गेल्या वर्षी बँकेनं जगातील इतर कोणत्याही मध्यवर्ती बँकेपेक्षा जास्त सोनं खरेदी केलं आणि बँकेकडील सोन्याच्या साठ्यात मागच्या ५० वर्षांतील सर्वाधिक वाढ झाली. चीन मागील एक दशकाहून अधिक काळापासून अमेरिकेच्या कर्जाचा भार कमी करत आहे. मार्चमध्ये चीनवर अमेरिकेचं सुमारे ७७५ अब्ज डॉलरचं कर्ज आहे. २०२१ च्या तुलनेत हे कर्ज १.१ ट्रिलियन डॉलरनं घटलं आहे.
बीजिंगमधील बीओसी इंटरनॅशनलचे जागतिक मुख्य अर्थशास्त्रज्ञ गुआन ताओ म्हणाले की, चीननं याआधी युआन वापरून देशांतर्गत सोनं खरेदी केलं आहे, परंतु यावेळी बँक सोनं खरेदी करण्यासाठी विदेशी चलन वापरत आहे. अमेरिकी डॉलर आणि इतर चलनांवरील अवलंबित्व कमी करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादून रशियाचा डॉलरचा साठा गोठवण्याचं पाऊल उचलल्यानंतर चीनसह अनेक केंद्रीय बँकांनी सोनं खरेदी करण्यास सुरुवात केली. अमेरिकेच्या इतर मित्र राष्ट्रांनीही अशाच प्रकारचे निर्बंध लादले आहेत. मात्र, चीन सोनं खरेदी करत आहे. चीनच्या परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा फक्त ४.६ टक्के आहे. टक्केवारीच्या बाबतीत, भारताकडं सोन्याचा साठा जवळपास दुप्पट आहे.