Garlic Price Hike : कांदा व बटाट्याइतकाच स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणेचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारात हीच परिस्थिती आहे. अनेक शहरांमध्ये एक किलो लसणाचा भाव ६०० रुपयांवर पोहोचला आहे. लसणेच्या या महागाईमुळं गृहिणींचा मूड आणि भाज्यांची चवच गेल्याचं चित्र आहे.
कमॉडिटी ऑनलाइननुसार, घाऊक बाजारात लसणाची आजची सरासरी किंमत ७२७५ रुपये प्रति क्विंटल आहे. कमाल सरासरी किंमत ८२०० रुपये आणि किमान ६४०० रुपये प्रति क्विंटल आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या गुलावटी मंडईत लसूण ८ हजार ते ८२०० रुपये प्रतिक्विंटल दरानं विकला जात आहे. लखनौमध्ये हाच भाव १४००० ते १७००० रुपये प्रति क्विंटल आहे.
लसणाच्या वाढत्या दरामुळं किरकोळ बाजारातही परिस्थिती गंभीर बनली आहे. वाशी येथील किरकोळ विक्रेते देवदास शिंदे यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात लसणांचा भाव प्रति किलो २८० ते ३०० रुपये होता. तो आता ५२० ते ६०० रुपये प्रति किलो झाला आहे. ग्राहक खरेदी करत नाहीत. ते फक्त किंमत विचारून निघून जातात, असं शिदे यांनी सांगितलं.
गेल्या आठवड्यात लसूण १४० रुपये किलो होती. वाशी येथील घाऊक बाजारात त्याची किंमत ३५० ते ३७५ रुपये प्रति किलो आहे. वाशी मार्केटमधूनच मुंबईसह आसपासच्या भागांत लसणाचा पुरवठा केला जातो.
वाशी बाजारातील घाऊक विक्रेते सूर्यकांत घोडेकर यांच्या मते, बाजारात लसणांचा पुरेसा पुरवठा होत नाही. गुजरातचा साठा संपत असून मध्य प्रदेशातून काहीसा साठा येत आहे. संपूर्ण देशात त्याची कमतरता आहे. पुढचे आणखी १५ दिवस लसणांचे दर असेच चढे राहतील. त्यानंतही भाव २०० रुपये किलोच्या खाली जाणार नाही. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान एक महिना लागेल, कारण तोपर्यंत नवीन साठा मुबलक प्रमाणात येईल, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या