Nitin Kamath : बेंगळुरू येथील टेकस्पार्क्स २०२४ मध्ये ‘झिरोधा’चे सह-संस्थापक नितीन कामत यांनी भारतीय लोकांच्या संपत्तीकडं बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल केलेल्या केलेल्या एका वक्तव्यामुळं नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
‘भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? असा प्रश्न ’युअरस्टोरी'च्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी कामत यांना विचारला होता. त्यावर कामत यांनी अमेरिका आणि भारतातील संपत्तीबाबतच्या परस्परविरोधी धारणांचा दाखला देऊन भाष्य केलं.
अमेरिकेत प्रचंड संपत्ती जमवणाऱ्या, हायफाय गाड्या आणि जेटसारख्या लक्झरी वस्तू खरेदी करणाऱ्या यशस्वी व्यक्तींवर टीका होत नाही. त्यांच्या यशाचं सेलिब्रेशन केलं जातं. याउलट, भारतात जेव्हा कोणी पैसे कमावतं, तेव्हा लोक त्याकडं खूप संशयानं पाहतात. काहीतरी गडबड असावी, अशी बऱ्याचदा लोकांची पहिली प्रतिक्रिया असते.
'अमेरिका हा शुद्ध भाकरी आणि भांडवलवादी समाज आहे, तर आपण समाजवादी आहोत, पण भांडवलवादी समाज असल्याचं भासवतो. मात्र, मुळात आपण सर्व समाजवादी आहोत, असं कामत म्हणाले.
पुढील काळात भारतीय लोकांचा हा दृष्टिकोन बदलेल का याबद्दलही कामत यांनी शंका व्यक्त केली. बदलत्या दृष्टिकोनाविषयी त्यांनी शंका व्यक्त केली. 'मला यात बदल होताना दिसत नाही. जोपर्यंत संपत्तीच्या बाबतीत वाढती विषमता आहे, तोपर्यंत यात काही बदल होईल असं वाटत नाही, असं कामत म्हणाले.
कामत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी कामत यांच्या परखड मांडणीचं कौतुक केले आहे. तर, काहींनी पक्षपात आणि भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या संपत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रतन टाटांसारख्या श्रीमंत व्यक्तींचा आम्ही तिरस्कार करत नाही, असं काहींनी म्हटलं आहे.
'सोशलिस्ट आणि कॅपिटलिस्ट गेलं खड्ड्यात! भारतात टोकाची आर्थिक विषमता आहे आणि भारतात उत्तम पैसे कमावणं किती कठीण आहे हे प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. हे एक सोपे उत्तर आहे, असं एका युजरनं म्हटलं आहे.
दुसऱ्या एका व्यक्तीनं म्हटलं आहे की, ‘आम्ही श्रीमंतांचा तिरस्कार करतो असं नाही... आम्ही रतन टाटांचा तिरस्कार करत नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे मार्ग अवलंबले जातात, ते कष्ट नव्हे, तर सरकारचा पक्षपातीपणा आणि भ्रष्टाचार असतो. कल्पकतेच्या जोरावर मिळवलेल्या श्रीमंतीवर टीका होत नाही, ती होते ती लॉबिंग करून मिळवलेल्या श्रीमंतीवर. भारतात कष्टातून श्रीमंत झालेले कमी आहेत.’
'भारतात अब्जाधीशांच्या तुलनेत इतरांकडील संपत्ती नगण्य आहे. कोणतीही आकडेवारी तपासा. अति हाव आणि संपत्ती वाटून घ्यायचीच नाही हा आडमुठेपणा हा खरा मुद्दा आहे. अमेरिकेत तसं होत नाही. त्यामुळंच भारतात अवघ्या १ टक्का लोकसंख्येकडं ४० टक्के संपत्ती आहे. या देशात नैतिक मार्गानं कुणीही कोट्यधीश होऊ शकत नाही हेच वास्तव आहे, असं काहींनी म्हटलं आहे.
संंपत्ती निर्माण करणं यात चुकीचं काहीच नाही. मात्र तिचा दिखावा करणं आणि आपण सर्वसामान्यांपेक्षा कोणी वेगळे आहोत हे भासवणं वा तसं वागणं ही अडचण आहे. अमेरिका किंवा इतर विकसित देशांमध्ये अशा गोष्टी घडत नाहीत, असा युक्तिवाद काहींनी केला आहे.