Adani Group Stocks News : गेल्या काही दिवसांपासून घसरत चाललेला शेअर बाजार आज किंचित सावरला. मात्र, काही कंपन्यांच्या शेअर्सनी या किंचित सकारात्मक वातावरणातही मोठी भरारी घेतली. त्यात अदानी समूहातील बहुतेक सर्व कंपन्यांचे शेअर होते. अदानी समूहातील सर्व १० शेअर्सना आज प्रचंड मागणी होती. त्यामुळं हे शेअर १८ टक्क्यांपर्यंत वधारले.
एनएसईवर अदानी पॉवरचा शेअर १९.९९ टक्क्यांनी वधारून ५३९.८५ रुपयांवर पोहोचला. त्याखालोखाल अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर १३.५२ टक्क्यांनी वाढून १०१० रुपयांवर गेला तर, अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर १२.२३ टक्क्यांनी वधारून ७७३ रुपयांवर पोहोचला.
अदानी टोटल गॅसच्या शेअरची किंमत ६.४३ टक्क्यांनी वाढून ६६८.६० रुपये झाली तर एनडीटीव्हीचा शेअरही ६.०७ टक्क्यांनी वधारून १४७.९० रुपयांवर पोहोचला. अदानी समूहाची प्रमुख कंपनी आणि निफ्टी ५० पॅकचा भाग असलेल्या अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर ७.०५ टक्क्यांनी वधारून २३८२ रुपयांवर बंद झाला.
एसीसी, अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट आणि सांघी इंडस्ट्रीजचे समभाग ४ ते ५ टक्क्यांनी वधारले. कंपनी बाहेर पडण्याच्या विचारात असलेल्या अदानी विल्मरच्या विक्रीची ऑफर सुरू झाल्यानंतर गेल्या दोन सत्रांमध्ये झालेल्या घसरणीनंतर तेजी आली आणि १.८३ टक्क्यांनी वधारला.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेली वाढ ही निधी उभारणीच्या सुरू असलेल्या चर्चेचं फलित आहे, असं मत लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी व्यक्त केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील प्रवेशामुळं अदानी समूहाला परकीय निधी उभा करणं सोपं जाईल, असा बाजाराचा अंदाज आहे आणि त्यामुळंच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नव्यानं खरेदी होत आहे, असं जैन म्हणाले.
अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं सध्याच्या स्थितीवर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, कंपनी सध्या सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांचा एक भाग म्हणून विविध संस्थांशी चर्चा करीत आहे, असं त्यांनी सांगितलं. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी असली मात्र या तेजीचे स्वरूप पाहता विश्लेषकांनी नव्यानं खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे.
अदानी समूहाचे शेअर्स कयासबाजीमुळं वाढत आहेत. या संदर्भात अदानी समूहाकडून अधिकृत निवेदन येण्याची वाट पाहिली पाहिजे. अदानी समूहाचे शेअर्स असलेल्यांनी स्टॉपलॉस लावून ठेवावा आणि गुंतवणूक कायम ठेवावी,' असा सल्ला हेन्सेक्स सिक्युरिटीजचे सहाय्यक उपाध्यक्ष (रिसर्च) महेश एम. ओझा यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या