Pavel Durov arrest : टेलिग्रामचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांना शनिवारी संध्याकाळी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मेसेजिंग अॅपवरील काही गंभीर त्रुटींच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
फ्रान्समधील रशियन दूतावासानं दुरोव यांना कॉन्सुलर अॅक्सेस देण्याची आणि त्यांना सर्व कायदेशीर अधिकार देण्याची मागणी केली आहे. दुरोव यांच्या अटकेच्या संदर्भात फ्रान्सनं अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही, असं रशियन दूतावासानं म्हटलं आहे.
रशियन वंशाचे ३९ वर्षीय उद्योजक पावेल दुरोव हे मेसेजिंग अॅप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ आहेत. ते अब्जाधीश असून फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, त्यांची संपत्ती १५.५ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.
सोशल मीडियाच्या जगात दुरोव यांचा प्रवास ‘रशियन फेसबुक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हीकोंटाक्टेपासून सुरू झाला. दुरोव यांनी २००६ मध्ये काही सहकाऱ्यांसोबत याची स्थापना केली. अल्पावधीतच व्हीकोंटाक्टे रशियाची सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट बनली, मात्र या वेगवान यशामुळं पुढं दुरोव यांचे रशियन सरकारशी मतभेद झाले. २०१४ मध्ये रशियन सरकारकडून त्यांच्यावर दबाव येऊ लागला. व्हीकोंटाक्टेवरील विरोधी आवाज बंद करण्याचं दडपण त्यांच्यावर आलं. दुरोव यांनी या दबावास भीक न घालता रशिया सोडणं पसंत केलं. त्यांनी व्हीकोंटकटेमधील आपला हिस्सा विकून स्वत:वर एक प्रकारचा हद्दपारीचा वनवास लादून घेतला.
२०१३ मध्ये दुरोव यांनी टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप लॉन्च केलं. हे अॅप एन्क्रिप्टेड मेसेजिंग फीचरच्या बळावर युजर्सची प्रायव्हसी जपतं. काही काळातच व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि वीचॅट सारख्या प्लॅटफॉर्मसाठी टेलिग्राम एक जबरदस्त स्पर्धक म्हणून पुढं आलं. सध्या जगभरातील कोट्यवधी लोक हे अॅप वापरतात. पुढील वर्षभरात हे अॅप एक अब्ज सक्रिय मासिक युजर्सचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
रशिया, युक्रेन आणि सोव्हिएत रशियातील इतर राज्यांमध्ये टेलिग्राम विशेषतः प्रभावी आहे. हे अॅप तिथं एक महत्त्वपूर्ण माहिती स्त्रोत म्हणून कार्य करतं, विशेषत: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या संदर्भात टेलिग्रामवर वेगवेगळी माहिती येत असते. रशियन आणि युक्रेनचे अधिकारी या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. टेलिग्राम हे जणू दोन देशातील संघर्षाची ‘आभासी युद्धभूमी’ बनलं आहे.
रशिया सोडल्यापासून दुरोव हे सतत प्रवास करत आहेत. ते स्वतःसाठी आणि आपल्या कंपनीसाठी सुरक्षित आश्रय शोधत आहेत. टेलिग्रामसाठी घराच्या शोधात ते बर्लिन, लंडन, सिंगापूर आणि सॅन फ्रान्सिस्कोमार्गे दुबईत स्थायिक झाले आहेत. सध्या टेलिग्रामचं मुख्यालय दुबईत आहे.
दुरोव २०२१ मध्ये फ्रेंच नागरिक बनले आणि त्याच्याकडे संयुक्त अरब अमिराती तसेच कॅरिबियनमधील सेंट किट्स अँड नेव्हिस या दुहेरी बेटांच्या राष्ट्राचे नागरिकत्व आहे.
टेलिग्रामला लोकप्रियता आणि लोकाश्रय सहज मिळालेला नाही. त्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. २०१८ मध्ये दुरोव यांनी रशियन सुरक्षा यंत्रणेला युजर्सच्या एन्क्रिप्टेड संदेशांचा वापर करू देण्यास नकार दिल्यानं रशियानं अॅप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. ही बंदी प्रभावी ठरली नाही, उलट स्वयंसेवी संस्थांकडून सरकारचा विरोध आणि टीकेची झोड उठली. अलीकडंच फ्रान्ससह युरोपीय देशांनी सुरक्षा आणि डेटा चोरीच्या चिंतेवरून टेलिग्रामची तपासणी केली आहे. युरोपमध्ये टेलिग्रामच्या वाढत्या लोकप्रियतेकडं युरोपियन युनियनच्या नियामकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
रशियातून बाहेर पडल्यानंतर दुरोव यांची एक अमेरिकी पत्रकारानं मुलाखत घेतली होती. त्यावेळी दुरोव यांनी मांडलेली भूमिका लक्ष वेधणारी आहे. ‘कोणाकडूनही ऑर्डर घेऊन काम करण्याऐवजी रिकामं राहणं मी पसंत करेन,’ असं ते म्हणाले होते.