Noel Tata Profile : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांची निवड झाली आहे. जगभरातील १०० देशांमध्ये पसरलेल्या १६५ अब्ज डॉलरच्या व्यावसायिक साम्राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळं त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
नोएल टाटा हे (६७) वर्षांचे असून सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ११वे अध्यक्ष आहेत आणि सर रतन टाटा ट्रस्टचे सहावे अध्यक्ष असतील. टाटा ट्रस्ट्सची टाटा सन्समध्ये ६६ टक्के भागीदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ब्रँड अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. टाटा सन्सला १५० वर्षांचा समृद्ध वारसा आहे. त्यामुळंच नोएल यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
नोएल एन टाटा हे मागील चार दशकांपासून टाटा समूहासोबत आहेत. ते नवल एच. टाटा आणि सिमोन एन टाटा यांचे चिरंजीव आहेत. टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि बिगर कार्यकारी संचालक म्हणून ते काम पाहत आहेत. ते सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या मंडळावर विश्वस्त आहेत.
टाटा ट्रस्ट्सच्या वेबसाइटनुसार, नोएल यांची मुले, माया, नेव्हिल आणि लेआ हे देखील कुटुंबाच्या धर्मादाय कार्यात गुंतलेले आहेत. टाटा ट्रस्टशी संबंधित विविध धर्मादाय संस्थांचे विश्वस्त म्हणून ते काम करतात.
नोएल टाटा हे त्यांच्या तुलनेनं लो-प्रोफाईल नेतृत्व शैलीसाठी ओळखले जातात. ही शैली रतन टाटा यांच्या लोकाभिमुख शैलीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. रतन टाटा यांचं नेतृत्व सार्वजनिक जीवनात वावरणारं होतं. ते मीडियाला टाळत नसत. नोएल मात्र प्रकाशझोतापासून कायमच दूर राहिले आहेत.
नोएल टाटा यांनी भारतातील आणि परदेशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं आहे. नोएल टाटा यांनी युनायटेड किंगडममधील ससेक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे आणि INSEAD इथं आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रम (IEP) पूर्ण केला आहे.
नोएल हे सध्या ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय, त्यांच्याकडं समूहातील अनेक महत्त्वाची पदं आहेत.
टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून ते २०१४ पासून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात ट्रेंटच्या शेअर्समध्ये ६,००० हून अधिक टक्क्यांनी वाढ झाली आहे. अलीकडच्या वर्षांत ही कंपनी टाटा समूहातील कंपन्यांपैकी एक प्रमुख बनली आहे. तीव्र स्पर्धा असतानाही नोएल यांच्या नेतृत्वाखाली ट्रेंटनं वेगानं आपला विस्तार केला आहे. कंपन्यांचं स्टोअर नेटवर्क आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
ट्रेंटच्या आधी नोएल हे २०१० ते २०२१ पर्यंत टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रमुख होते. त्यांच्या काळात या कंपनीचा महसूल ५०० डॉलर दशलक्ष वरून ३ बिलियन डॉलरपेक्षा जास्त वाढला आहे.