Jensen Huang earning this year : ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनं जगभरातील श्रीमंतांच्या वार्षिक कमाईची यादी जाहीर केली आहे. त्यात अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक जेन्सेन हुआंग यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यंदाच्या कमाईच्या बाबतीत हुआंग यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि आशियातील अब्जाधीश मुकेश अंबानी व अदानी यांनाही मागे टाकलं आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, हुआंग यांच्या संपत्तीत गुरुवारी ९.५९ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती आता ६९.२ अब्ज डॉलर्स आहे आणि श्रीमंतांच्या यादीत ते २१व्या क्रमांकावर आहेत. मात्र या वर्षीच्या कमाईच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मेटाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग या वर्षी कमाईत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती ६४.४ अब्ज डॉलरनं वाढली आहे. जेन्सेन हुआंग यांनी २५.२ अब्ज डॉलरच्या कमाईसह दुसरं स्थान पटकावलं आहे. तर, जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. बेझोस यांची संपत्ती या वर्षात आतापर्यंत २०.२ अब्ज डॉलरनं वाढली आहे. बेझोस हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. एलॉन मस्क या वर्षी कमाईत मागे पडले असून टॉप लूजर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.
संपत्तीच्या बाबतीत जगात सातव्या क्रमांकावर असलेले वॉरेन बफे हे यंदा कमाईमध्ये चौथ्या स्थानी आहेत. या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये १८.१ अब्ज डॉलर वाढले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी १८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १५.८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
हुआंग हे कम्प्युटर प्रोसेसर आणि एआय तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्या Nvidia चे अध्यक्ष आहेत. त्यांनी १९९३ मध्ये कंपनीची स्थापना केली आणि १९९९ मध्ये पहिलं ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट सुरू केलं. हुआंग यांनी एकेकाळी वेटर म्हणूनही काम केलं होतं, परंतु आज त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.
१९६३ मध्ये तैवानमधील तैनान इथं जन्मलेले जेन्सेन हुआंग हे ५ वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब प्रथम थायलंडला गेलं. वयाच्या ९व्या वर्षी जेन्सेन हे त्यांच्या भावासोबत टॅकोमा, वॉशिंग्टन इथं काकांकडे राहण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी अलोहा हायस्कूलमधून ओनिडा एलिमेंटरीमधून शिक्षण पूर्ण केलं. हुआंग यांनी इथल्या डेनीज रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणूनही काम केलं.
हुआंग यांची बहुतेक संपत्ती संगणक प्रोसेसर आणि AI उत्पादनं बनवणाऱ्या Nvidia मधील त्याच्या शेअरमधून येते. त्याच्या वेबसाइटनुसार, हुआंग यांनी ख्रिस मालाचोव्स्की आणि कर्टिस प्रीम यांच्यासह कॅलिफोर्नियास्थित सांता क्लारा या कंपनीची स्थापना केली आहे.
Nvidia कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारी १६ टक्क्यांनी वाढून ७८५.३८ डॉलरवर पोहोचली. एका दिवसात कंपनीचं बाजार मूल्य २७७ अब्ज डॉलरनं वाढलं. हा एक नवीन विक्रम आहे. Nvidia चं एकूण मार्केट कॅप आता १.८९ डॉलर ट्रिलियन आहे. मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल नंतर ही तिसरी सर्वात मोठी अमेरिकन कंपनी बनली आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी इलॉन मस्क यांची जागा घेतली आहे. फोर्ब्सच्या मते, अरनॉल्टची एकूण संपत्ती सध्या २२८.३ अब्ज डॉलर आहे. दुसऱ्या स्थानावर घसरलेल्या एलॉन मस्क यांची संपत्ती २०७.५ अब्ज डॉलर आहे.