Jeet Adani Marriage News : भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अदानी कुटुंबानं नुकतीच प्रयागराज येथील पवित्र महाकुंभमेळ्याला भेट दिली. यावेळी अदानी कुटुंबानं गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी याच्या लग्नाची तारीख जाहीर केली. जीतचा विवाह दिवा जैमिन शहा हिच्याशी होणार आहे.
जीतचं लग्न ७ फेब्रुवारीला होणार असून ते साधं आणि पारंपारिक पद्धतीनं होईल. लग्नाचा सोहळा इतर सर्वसामान्य कुटुंबासारखाच होईल, असं खुद्द गौतम अदानी यांनी सांगितलं. अदानी कुटुंबाच्या या घोषणेनंतर आता गौतम अदानी यांच्या धाकट्या सुनेची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया कोण आहे जीत अदानी याची होणारी पत्नी दिवा जैमिन शहा.
> दिवा जैमीन शाह ही भारतातील एका प्रतिष्ठित आणि गर्भश्रीमंत कुटुंबातील आहे. प्रसिद्ध हिरे व्यापारी जैमिन शाह यांची ती मुलगी आहे. १९७६ मध्ये स्थापन झालेल्या सी. दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध हिरे उत्पादक कंपनीची ती सहमालक आहे.
> सुरत आणि मुंबईत मुख्यालयं असलेल्या या कंपनीनं हिरे व्यापाराचं क्षेत्र अक्षरशः व्यापून टाकलं आहे.
> जैमिन शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि जिगर दोशी, अमित दोशी आणि योमेश शाह यांच्यासारख्या सहकाऱ्यांच्या योगदानामुळं सी. दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडनं जागतिक हिरा बाजारपेठेत मजबूत पकड मिळवली आहे.
> दिवा ही प्रसिद्धीपासून दूर असली तरी हिरे व्यवसायातील तिच्या कुटुंबाचा प्रभाव खूप काही सांगून जातो. अदानी कुटुंबासोबत त्यांच्या नात्याला त्यामुळंच महत्त्व आहे.
> जीत अदानी आणि दिवा जैमीन यांचा साखरपुडा १४ मार्च २०२३ रोजी एका खासगी समारंभात झाला होता.
जीत अदानी हे सध्या अदानी ग्रुपमध्ये ग्रुप फायनान्सचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसचे ते माजी विद्यार्थी आहेत. स्ट्रॅटेजी, रिस्क मॅनेजमेंट आणि कॅपिटल मार्केटवर लक्ष केंद्रित करून ग्रुप सीएफओ ऑफिसर म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली.
जीत हे अदानी एअरपोर्ट आणि अदानी डिजिटल लॅब्सचं नेतृत्व करतात. ही लॅब सध्या अदानी समूहाच्या ग्राहकांसाठी एक सुपर अॅप विकसित करत आहे.
संबंधित बातम्या