मुंबईत शिकत असताना कॉलेजचे तास संपल्यावर उरलेल्या वेळात मी दारोदार फिनेल विकायचो. या दोन वर्षांच्या काळात मला ग्राहकांचे विविध नमुने अनुभवास आले आणि आयुष्यातील पहिल्या लबाड माणसाचा चेहराही पाहायला मिळाला. स्वार्थासाठी माणसे मुखवटा कसा परिधान करतात हे त्या अनुभवातून समजले.
उपनगरात पायपीट करत असताना मी एका घरी गेलो. त्या गृहस्थांनी पहिल्या भेटीत माझी सहानुभूतीने चौकशी केली. फिनेलची बाटली खरेदी करुन त्वरित पैसेही चुकते केले आणि दर महिन्याला येण्यास आवर्जून सांगितले. पुढच्या महिन्यात मी आठवणीने त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी फिनेलची बाटली ठेऊन घेतली आणि पैसे नंतरच्या फेरीत घेऊन जाण्यास सांगितले. तिसऱ्या महिन्यात मी गेलो तेव्हा उतरलेल्या चेहऱ्याने ते म्हणाले, “मुला, तुला मदत करण्याची खूप इच्छा होती, पण मीच आर्थिक अडचणीत असल्याने मला फिनेल नको.” ते ऐकताच मी सहानुभूतीने त्या गृहस्थांना म्हणालो, “काका, हरकत नाही. मी दर महिन्याला फिनेल देत जाईन. तुम्ही सवडीने पैसे द्या.” त्याप्रमाणे मी पुढचे तीन महिने त्यांच्याकडे फिनेल पोचवत राहिलो.
हळूहळू माझ्या मनात शंका येऊ लागली. फिनेलच्या बाटलीची त्यावेळी किंमत होती अवघी दहा रुपये. सहा महिन्यांच्या काळात या गृहस्थांना ५० रुपयांतील काहीही बाकी द्यावीशी वाटली नाही, हे आश्चर्यच होते. मी त्यांच्या घरी जाताच त्यांचा चेहरा उदास होई. मलाही फार बोलता येत नसे. पण दुसरीकडे या सहानुभूतीच्या गुंत्यामध्ये माझे नुकसान हळूहळू वाढत चालले होते. या गृहस्थांच्या दीनवाण्या मुखवट्यामागचा खरा चेहरा माझ्या त्यावेळेस लक्षात आला जेव्हा मी सहाव्या फेरीत ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी ते गृहस्थ घरात नव्हते तर त्यांची पत्नी होती. मी त्या काकूंना माझी अडचण सांगितली. त्या काही बोलल्या नाहीत. स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी ५० रुपये आणून मला दिले आणि सूचक बोलल्या, “मुला, तू भोळा आहेस. यापुढे येऊ नकोस.” मोजक्या शब्दांत त्या माऊलीने मला खूप काही सांगितले.
मी आमच्या कंपनीचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर एक मुखवटा पाहायला मिळाला. एकदा अचानक मला माझ्या एका कर्मचाऱ्याचा फोन आला. तो अत्यंत काकुळतीने बोलत होता. पोलिसांनी आपल्याला पकडले असून आपण निरपराध असल्याचे तो पुन्हा पुन्हा सांगत होता. मी त्याच्याकडून घडलेला प्रकार विचारुन घेतला. त्याने क्रेडिट कार्डवर खरेदी केली होती आणि नंतर त्याचे पैसे खात्यात भरायला विसरुन गेला होता. वेळेवर वसुली न झाल्याने कंपनीने अखेर पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.
माझ्यापुढे पेच निर्माण झाला. एक तर तो आमच्या कंपनीच्या व्हिसावर आला होता आणि त्याच्या निष्काळजी वागण्याने आमचे नाव खराब होत होते. मी दंड भरुन त्याला सोडवले आणि क्रेडिट कार्डची बाकीही चुकती केली. नंतर त्याला खूप सुनावले. परदेशात राहताना बेफिकीर राहून कसे चालत नाही, हे परोपरीने पटवून दिले. तो सगळे निमूट ऐकून घेत होता. मलाही वाटले, की त्याच्या शांतपणावरुन त्याला चुकीची जाणीव झाली असणार. पण आश्चर्य म्हणजे त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. याखेपेस त्याने दुसऱ्या शहरात जाऊन खरेदी केली होती. मला ते कळताच मी संतापलो. मला लक्षात आले, की हा माणूस वाटतो तितका निरागस नाही. याच्या भोळ्या चेहऱ्यामागे एका पांढरपेशा लबाड गुन्हेगाराचा चेहरा लपला आहे. मी हा प्रकार कायमचा संपवण्याचा निश्चय केला. पुन्हा एकदा दंड आणि थकबाकी भरुन मी त्याला सोडवले आणि तत्काळ नोकरीवरुन काढून त्याची रवानगी भारतात केली. जाताना तो मला भेटायलाही आला नाही किंवा त्याने माफीही मागितली नाही. त्याने मुंबईतही असेच प्रकार केल्याचे नंतर कानावर आले.
या प्रसंगानंतर मी कानाला खडा लावला. शहानिशा न करता बापुडवाण्या चेहऱ्यांवर विश्वास ठेऊन कुणालाही आर्थिक मदत करणे सोडून दिले. सामाजिक संस्थांनाही दानरुपात आर्थिक मदत करताना आम्ही त्यांचा पूर्वेतिहास नीट तपासून बघू लागलो. दान कुणाला करावे याबाबत एका सुभाषितात म्हटले आहे,
वित्तं देहि गुणान्वितेषु मतिमन्नान्यत्र देहि क्वचित्।
प्राप्तं वारिनिधेर्जलं घनमुखे माधुर्ययुक्तं सदा॥
(अर्थ – हे बुद्धिमान माणसा, पैसा दान करायचा असेल तर गुणी लोकांनाच दे. गरज नसलेल्याला देऊ नकोस. समुद्राचे खारट पाणी जसे मेघ घेतो आणि पावसाच्या रुपात गरजूंपर्यंत मधुर चवीने पोचवतो)