भारतातील कोणत्या कंपन्यांना बसू शकतो बांगलादेशातील अराजकाचा फटका? गुंतवणूकदार असाल तर बारीक लक्ष ठेवा!-which indian companies can be affected by the bangladesh crisis ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  भारतातील कोणत्या कंपन्यांना बसू शकतो बांगलादेशातील अराजकाचा फटका? गुंतवणूकदार असाल तर बारीक लक्ष ठेवा!

भारतातील कोणत्या कंपन्यांना बसू शकतो बांगलादेशातील अराजकाचा फटका? गुंतवणूकदार असाल तर बारीक लक्ष ठेवा!

Aug 06, 2024 10:11 AM IST

Bangladesh crisis impact : बांगलादेशातील अराजकी परिस्थितीचा भारतातील काही कंपन्यांवर परिणाम होणार आहे. कोणत्या आहेत या कंपन्या? पाहूया…

भारतातील कोणत्या कंपन्यांना बसू शकतो बांगलादेशातील अराजकाचा फटका?
भारतातील कोणत्या कंपन्यांना बसू शकतो बांगलादेशातील अराजकाचा फटका? (REUTERS)

Bangladesh crisis impact : भारताचा शेजारी आणि मित्र देश असलेल्या बांगलादेशमध्ये लष्करानं सत्ता ताब्यात घेतल्यानं तिथली परिस्थिती झपाट्यानं बदलत आहे. तिथल्या परिस्थितीचा भारतावर विशेषत: उद्योग जगतावर लगेचच परिणाम होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेशात सुरू झालेल्या आंदोलनानं सत्तांतर घडवून आणलं आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला आहे. त्यांनी भारतात उतरल्यानंतर हिंडन एअरबेसवर एनएसए अजित डोवाल यांची भेट घेतली. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या लंडनला रवाना झाल्या आहेत. आता बांगलादेशात लष्कराच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार आहे. साहजिकच अनेक धोरणांमध्ये बदलाची शक्यता आहे. तत्पूर्वी, तातडीचा परिणाम उद्योग-व्यवसायांवर होणार आहे. डाबरपासून ट्रेंटपर्यंत अनेक भारतीय कंपन्यांची बांगलादेशात मोठी बाजारपेठ आहे. तसंच, काही कंपन्याची पुरवठा साखळीमध्ये भागीदारी आहे.

या भारतीय कंपन्यांवर होऊ शकतो परिणाम?

व्हीआयपी इंडस्ट्रीज

सीएनबीसी टीव्ही १८ नुसार, व्हीआयपी इंडस्ट्रीजचे बांगलादेशात ८ कारखाने आहेत आणि सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन इथं घेतलं जातं. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, सॉफ्ट लगेजची मागणी कमी झाल्यानं व्हीआयपी इंडस्ट्रीजनं कर्मचारी कपातीसह बांगलादेशातील आपल्या उत्पादन केंद्राची पुनर्रचना केली होती.

मॅरिको

बांगलादेश हा मॅरिकोच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा एक महत्त्वाचा घटक असून कंपनीच्या एकूण महसुलात बांगलादेशचा एक चतुर्थांशहून अधिक वाटा आहे. मॅरिकोच्या आंतरराष्ट्रीय महसुलापैकी ४४ टक्के महसूल बांगलादेशातून मिळतो. आर्थिक वर्ष २०२२ मधील ५१ टक्क्यांवरून मॅरिकोनं आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरीस आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारात बांगलादेशचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

डाबर, जीसीपीएल आणि ब्रिटानिया

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील या तिन्ही कंपन्यांवर बांगलादेशातील परिस्थितीचा परिणाम दिसणार आहे. या तिन्ही कंपन्या बांगलादेशात विक्री करतात. मात्र, हे प्रमाण त्यांच्या एकूण महसुलाच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

जुबिलिएन्ट फूडवर्क्स

डोमिनोज ऑपरेटर जुबिलिएन्ट फूडवर्क्सची बांगलादेशात २८ स्टोअर्स आहेत. त्यांच्या एकूण विक्रीच्या सुमारे १ टक्के विक्री बांगलादेशात होते.

ट्रेंट

टाटा समूहाच्या कंपनी ट्रेंटच्या सोर्सिंगसाठी हाँगकाँग आणि थायलंडसह बांगलादेश हा एक महत्त्वाचा देश आहे. मात्र, बांगलादेशातून किती सोर्सिंग करण्यात आलं, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. या कंपन्यांव्यतिरिक्त कपडे आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित शेअर बांगलादेशातील या संकटांचे लाभार्थी ठरू शकतात.

एलआयसीचं कार्यालय बंद

भारतीय आयुर्विमा महामंडळाचं (LIC) बांगलादेशमधील कार्यालय ७ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. एलआयसीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीमुळं एलआयसीचं कार्यालय ५ ऑगस्ट २०२४ ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बंद राहणार आहे. बांगलादेश सरकारनं ५ ते ७ ऑगस्ट २०२४ या तीन दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे.

विभाग