मराठी बातम्या  /  बिझनेस  /  gold news : जगातील कोणता देश सर्वात जास्त सोनं खरेदी करतो आणि का?

gold news : जगातील कोणता देश सर्वात जास्त सोनं खरेदी करतो आणि का?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 31, 2023 10:28 AM IST

Highest Gold Consuming country : जगातील सर्वाधिक सोनं खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा नंबर कितवा आहे. जाणून घ्या…

Gold
Gold

30 Years of Central Bank Gold Demand : सोन्या-चांदीचा विषय निघाला की सोन्याचे दागिने आणि भारतीय महिला वर्ग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. सोनं हा भारतीयांसाठी वर्षानुवर्षे जिव्हाळ्याचा विषय आहे. अडीअडचणीला उपयोगी पडेल म्हणून दागिन्यांच्या स्वरूपात सोनं जवळ ठेवण्याची प्रथा भारतात आहे. त्यामुळं साहजिकच भारतात सोन्याची मागणी मोठी असते. त्यामुळं भारत हाच सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार असेल, अशी समजूत असते. मात्र, ती खरी नाही.

ट्रेंडिंग न्यूज

सोन्याचं आकर्षण फक्त भारतीयांनाच आहे असं नाही. जगभरात या धातूचं आकर्षण आहे. सोन्याच्या खाणीतून बाहेर पडलेल्या सोन्यापैकी एक पंचमांश सोनं हे विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडं आहे. गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांव्यतिरिक्त जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याच्या प्रमुख ग्राहक आहेत. १९६७ नंतर मागील वर्षी म्हणजेच, २०२२ मध्ये मध्यवर्ती बँकांनी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली आहे. मात्र, या सोने खरेदीचे स्वरूप १९९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या खरेदीशी तुलना करता अगदी विरुद्ध आहे. त्या काळात मध्यवर्ती बँका सोन्याच्या विक्रेत्या होत्या.

जगभरातील केंद्रीय बँका सोने का खरेदी करतात?

  • परकीय चलनाचा साठा संतुलित राखण्यासाठी केंद्रीय बँका सोनं खरेदी करतात. आर्थिक अडचणीच्या काळात अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी सोन्याची मदत होते. त्यामुळं मध्यवर्ती बँकांनी अनेक वर्षांपासून सोन्याचा पुरेसा साठा ठेवला आहे.
  • महागाईमुळं देशांतर्गत चलनाची किंमत (विशेषत: डॉलरच्या तुलनेत) कमी होत असल्यास सोनं हे देशाची क्रयशक्ती कायम राखण्याचं काम करतं.
  • सोने आणि डॉलरचे नाते उलट आहे. डॉलरचे मूल्य घसरते, तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. सोन्यामुळं मध्यवर्ती बँकांना अस्थिरतेपासून संरक्षण मिळतं.

रशिया सर्वात मोठा खरेदीदार, भारत कितव्या क्रमांकावर

जागतिक नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, १९९९ च्या शेवटी आणि २०२१ च्या अखेरीस, सोन्याच्या अधिकृत खरेदीदार असलेल्या १० मध्यवर्ती बँकांनी एकूण सोन्याच्या ८४ टक्के सोनं खरेदी केलं होतं. या कालावधीत म्हणजे मागच्या दोन दशकांत रशिया आणि चीन या देशांनी सर्वाधिक सोनं खरेदी केलं आहे. २०१४ मध्ये क्रिमियाच्या विलिनीकरणानंतर रशियावर पाश्चात्य देशांनी मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले होते. त्या तडाख्यातून सावरण्यासाठी रशियानं सोन्याची खरेदी वाढवली. सर्वाधिक सोनं खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. तर, तुर्की तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, सोने खरेदीदारांच्या टॉप टेन यादीतील बहुतेक देश हे विकसनशील आहेत. हे देश चलन साठ्याचा समतोल राखण्यासाठी व प्रामुख्याने अमेरिकी डॉलरवर परिणाम करणाऱ्या आर्थिक आणि भू-राजकीय धोक्यापासून बचाव करण्यासाठी सोनं साठवत आहेत. दुसरीकडं स्वित्झर्लंड, फ्रान्स, नेदरलँड्स आणि यूकेसह अन्य युरोपीय देशांनी १९९९ ते २०२१ या कालावधीत सेंट्रल बँक गोल्ड अॅग्रीमेंट कराराअंतर्गत सोन्याची सर्वाधिक विक्री केली.

२०२२ मध्ये कोणत्या केंद्रीय बँकांनी सोने खरेदी केले?

ऑक्‍टोबर २०२२ पर्यंत तुर्कस्तानची मध्यवर्ती बँक सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार होती. त्यांनी आपल्या साठ्यात १४८ टनांची भर घातली. अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ६२ टन सोन्याची खरेदी केली. भारतानं ३३ टन सोनं खरेदी केलं. या कालावधीत विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून खरेदी केलेल्या एकूण सोन्याच्या तुलनेत ही खरेदी केवळ ३ टक्के इतकी होती.

WhatsApp channel

विभाग