नवीन वर्ष सुरू होऊन दोन आठवडे उलटले असून शेअर बाजारानं आताच नवा उच्चांक गाठला आहे. स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सच्या किंमती प्रमाणाबाहेर वाढल्यानं गुंतवणूकदारांचा गोंधळ उडालेला आहे. अशा परिस्थितीत २०२४ या वर्षात पैसे कुठे गुंतवावेत याबाबत बाजार तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत.
एखाद्याला ५ लाख रुपयांची गुंतवणूक करायची असेल तर त्यानं ती कुठं करायची यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे. या रकमेचा मोठा भाग लार्ज कॅप म्युच्युअल फंड आणि उर्वरित भाग डेट सिक्युरिटीजमध्ये दिला पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लार्ज कॅप शेअरच्या किंमती अद्यापही अति प्रमाणात वाढलेल्या नाहीत. तर, व्याजदर बऱ्याच प्रमाणात वाढलेले असल्यानं डेट फंडांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली पाहिजे. काही पैसे मुदत ठेवी आणि रोखे आणि डेट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवावेत असं तज्ज्ञांचं सांगणं आहे.
तुमच्याकडील ५ लाख रुपये हुशारीनं गुंतवायचे असल्यास त्यातील ७० टक्के म्हणजे ३.५ लाख रुपये लार्ज कॅप फंडात, तर उर्वरित डेट फंडांमध्ये गुंतवणं हा एक पर्याय आहे.
वेल्थ लॅडर डायरेक्टचे संस्थापक श्रीधरन एस यांच्या मतानुसार, लार्ज कॅप शेअर्समध्ये ७० टक्के गुंतवणूक केली पाहिजे. कारण हे शेअर्स सध्या त्यांच्या योग्य किंमतीला उपलब्ध आहेत. वाढीची क्षमता असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. उर्वरित रक्कम दोन ते तीन वर्षांच्या कालावधीच्या डायनॅमिक बाँड फंडांमध्ये गुंतवता येऊ शकते.
'महागाई कमी झाल्यानं व्याजदरात घसरण होण्याची शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम कॉर्पोरेट कंपन्यांच्या उच्च उत्पन्नात आणि पर्यायानं शेअर्सच्या किमतीवर दिसून येईल, असा विश्वास श्रीधरन यांनी व्यक्त केला आहे.
गुंतवणुकीचा निर्णय हा गुंतवणुकीच्या कालावधीनुसार घेणे अपेक्षित असते. अर्थात, ही गुंतवणूक अल्पकाळासाठी आहे की दीर्घ काळासाठी यावर बऱ्याचदा ती कुठे करायची हे ठरते. तुमचं उद्दिष्ट दीर्घकालीन असेल तर अल्पमुदतीच्या अस्थिरतेत वाहून न जाऊ नयेय 'योग्य खरेदी करा आणि योग्य वेळेपर्यंत बसा!' ही म्हण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरते. याउलट अल्पकाळातील चढउतारातून पैसा कमवायचा असेल आणि गुंतवणुकीसाठी काही रक्कम असेल तर कुठं गुंतवणूक करायची याची नीट काळजी घेतली पाहिजे.
अपना धन फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संस्थापक प्रीती झेंडे यांनी याविषयी त्यांचं मत मांडलं. 'आपल्या आर्थिक उद्दिष्टांसाठी एकरकमी गुंतवणूक करावी, असा माझा सल्ला असतो. त्यामुळं आपल्याकडं विशिष्ट रक्कम असेल तर नजिकच्या काळातील एखाद्या कामासाठी ती लागणार आहे की नाही याचा आधी अंदाज घ्या. तसं असेल तर ती रक्कम तुम्हाला वापरता येईल. प्रत्यक्ष वापराची वेळ येईपर्यंत त्या रकमेची अल्प मुदतीची एफडी करा. जर लगेचच या रकमेची गरज नसल्यास तिचा वापर दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी करता येतो, असं प्रीती झेंडे सांगतात.
सध्या बाजारात तेजी असली तरी लार्ज कॅप किंवा इंडेक्स फंड आणि फ्लेक्सी कॅपसाठी फंडाची निवड करून त्यात गुंतवणूक करता येईल. मिड आणि स्मॉल कॅप टाळणं चांगलं राहील. पीपीएफ/सुकन्य समृद्धी योजना, एनपीएस किंवा गिल्ट फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील निवडता येईल, असं त्या म्हणतात.
सेबीच्या नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार रेणू माहेश्वरी यांनी काहीसं वेगळं, पण ठाम मत मांडलं आहे. 'अल्पमुदतीच्या गुंतवणुकीवर माझा विश्वास नाही. सर्व पैसे हे नेहमीच आपल्या आयुष्यासाठी आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवले पाहिजेत. हे ५ लाख रुपये देखील त्यास अपवाद नसावेत. कॅलेंडर वर्ष बदललं म्हणून गुंतवणुकीच्या मूलभूत तत्व बदलू नये,' असं त्या म्हणाल्या.