Radhika Gupta Investment Tips : गुंतवणूक हा हल्ली सर्वसामान्यांच्या तोंडचा शब्द झाला आहे. सोशल मीडियामुळं गुंतवणुकीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळं लोकही त्याबाबत विचार करू लागले आहेत. गुंतवणूक हा लवकरात लवकर केली तर अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळं अगदी मुलांच्या नावावरही गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. मात्र, अल्पवयीन मुलांसाठीच्या गुंतवणुकीबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते दूर होणं महत्त्वाचं आहे.
एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक राधिका गुप्ता हे गैरसमज दूर करण्यावर भर देतात. राधिका गुप्ता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेक टिप्स देत असतात. या टिप्स नुकतेच आई-वडील झालेल्या व इतर गुंतवणूकदारांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतात.
सर्वप्रथम मुलांचं जन्म प्रमाणपत्र, आधार, पॅन आणि नंतर बँक खाते तयार ठेवा. ही सर्व कागदपत्रं बनवणं आता खूप सोपं झालं आहे. मुलाचा जन्म होताच आता पॅनकार्ड मिळू शकते. त्यानंतर मुलाच्या नावानं नियमित फंडात गुंतवणूक सुरू करता येते.
कमीत कमी वयात गुंतवणूक करणं आणि गुंतवणूक करण्याचा केवळ विचार न करता तात्काळ त्यावर अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं असल्याचं राधिका गुप्ता यांचं म्हणणं आहे. त्यांनी स्वत:चं मूल अवघं सहा महिन्यांचं असताना त्याच्या नावे इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तर, त्यांनी स्वत:ची गुंतवणूक वयाच्या २४व्या वर्षी सुरू केली होती. तर, राधिका यांच्या वडिलांनी वयाची ४० पार केल्यानंतर पोर्टफोलिओ तयार करण्यास सुरुवात केली.
गुंतवणूक करण्याआधी ती गुंतवणूक कोणत्या कामासाठी केली जात आहे, ते निश्चित करण्याचा प्रयत्न करा. आपलं लक्ष्य ठरवा. उच्च शिक्षण हे मुलांसाठीचं एक लक्ष्य असू शकतं. त्यासाठी बचत करता येते. लक्ष्य निश्चित झाल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम ठरवा. त्यासाठी तिचं वयाच्या संख्येत विभाजन करा.
राधिका गुप्ता या मासिक एसआयपीचा आग्रह धरतात. दोन ते तीन फंड उपयुक्त ठरतात, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर आर्थिक तजवीज करण्यासाठी तुम्ही मिड कॅप, स्मॉल कॅप आणि आंतरराष्ट्रीय फंडाचा पर्याय वापरू शकता.
तुमचं आर्थिक लक्ष्य जसजंस बदलेल, तसतसा तुमच्या गुंतवणुकीचा फेरआढावा घ्या. तुम्ही ध्येयाच्या पोहोचला की अधिक पारंपरिक व्हा. मुलं जसजशी मोठी होतील, तशी त्यांना सुद्धा या प्रक्रियेत सहभागी करून घ्या.
गुंतवणुकीची हीच एकमेव आणि परिपूर्ण पद्धत नाही. तुम्ही गरजेनुसार स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करू शकता, परंतु गुंतवणूक सुरू करण्यासाठी राधिका गुप्ता यांनी दिलेल्या टिप्स पुरेशा ठरू शकतात. जे लोक त्यांच्या मुलांना गिफ्ट म्हणून युनिट्स किंवा एसआयपी भेट देतात त्यांचं कौतुक करण्यास विसरू नका. त्यांना प्रोत्साहन द्या.
(डिस्क्लेमर: हा लेख केवळ माहितीपर असून त्यातील मतं ही तज्ज्ञांची स्वत:ची आहेत. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.)
संबंधित बातम्या