WhatsApp Video call feature : मेटाच्या मालकीचे व जगप्रसिद्ध असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप हे ॲप जगभरातील लाखो यूझर्स वापरतात. भारतात देखील मोठ्या प्रमाणात नागरिक व्हॉट्सॲप मेसेजिंगसाठी वापरतात. व्हॉट्सॲपच्या मदतीने चॅटिंग आणि फाइल शेअरिंग व्यतिरिक्त व्हिडिओ कॉलिंगही सहज करता येते. व्हॉट्सॲप गेल्या काही दिवसांपासून विविध अपडेट यूझर्ससाठी आणत आहेत. आता व्हिडिओ कॉलिंगसाठी भन्नाट अपडेट व्हॉट्सॲपने आणले आहे. या द्वारे वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉलिंग दरम्यान फिल्टर लावता येणार आहे. तसेच त्यांचे बॅगग्राऊंड देखील त्यांना बदलात येणार आहे.
व्हॉट्सॲपने या पूर्वी हे फीचर ॲपच्या कॅमेरा यूजर इंटरफेसमध्ये उपलब्ध करून दिले होते. मात्र, आता हे फीचर व्हिडिओ कॉलमध्ये देखील उपलब्ध करून दिले आले आहे. आता व्हिडिओ कॉलिंग दरम्यान हे फिल्टर वापरता येणार आहे. व्हॉट्सॲप उघडल्यानंतर वापरकर्त्यांनी कॅमेरा आयकॉनवर टॅप केल्यास त्यांना हे फिल्टर वापरण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय, व्हिडिओ कॉलिंग दरम्यान, 'जादूच्या छडी' सारखे नवीन चिन्ह विंडोमध्ये दिसू लागले आहे, ज्याद्वारे नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली असून ती देखील यूझर्सला वापरता येणार आहे.
या नव्या फीचरच्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर, वापरकर्त्यांना फिल्टरचे विविध पर्याय दिसतील. तसेच ते वापरता देखील येतील. यासाठी त्यांना उजवीकडे स्वाइप करून फिल्टर एकामागून एक बदलता येणार आहे. या फीचरमध्ये वॉर्म, कूल, बी अँड डब्ल्यू, लाइट लीक, ड्रीमी, प्रिझम लाईट, फिशये, विंटेज टीव्ही, फ्रॉस्टेड ग्लास आणि ड्युओ टोन यांचा समावेश आहे. याशिवाय, जर तुम्ही कमी-प्रकाशात कॉल करत असाल तर, लाइट मोडसह कमी प्रकाशातही व्हिडिओ कॉल करू शकणार आहात.
अनेक कॉन्फरन्सिंग ॲप्समध्ये वापरकर्त्यांना त्यांचे बॅगग्राऊंड बदलण्याचा पर्याय दिला जातो आणि आता व्हॉट्सॲपमध्येही असाच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंग दरम्यान बॅगग्राउंड बदला येणार आहे. या बॅगग्राऊंडच्या यादीमध्ये ब्लर, लिव्हिंग रूम, ऑफिस, कॅफे, पेबल्स, फूडी, स्मूश, बीच, सनसेट, सेलिब्रेशन आणि फॉरेस्ट इत्यादींचा समावेश आहे. नवीन फिल्टर आणि बॅगग्राऊंड देखील एकत्र वापरता येणार आहे.
हे नवे फीचर सध्या Android आवृत्ती 2.24.20.20 साठी WhatsApp Beta चा एक भाग म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यांत प्रत्येकाला व्हॉट्सॲपचे हे नवे फीचर वापरता येणार आहे.