Srinivas Pallia Annual Package : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे नवीन सीईओ म्हणून श्रीनिवास पल्लिया यांची अलीकडंच नियुक्ती झाली आहे. ३२ वर्षीय पल्लिया यांनी ७ एप्रिल रोजी सीईओ आणि एमडी म्हणून कार्यभार स्वीकारला. ते पाच वर्षे या पदावर राहणार असून त्यांना वर्षाला सुमारे ५० कोटी रुपयांचं पॅकेज मिळणार आहे.
विप्रोनं सोमवारी बीएसईवर पोस्ट केलेल्या शेअरधारकांना दिलेल्या नोटीसमध्ये याचा खुलासा केला आहे. सुमारे तीन दशके विप्रोमध्ये काम करणाऱ्या पल्लिया यांनी कंपनीच्या विविध विभागात महत्त्वाची पदं भूषवली आहेत. कन्जुर बिझनेस युनिटचे अध्यक्ष, बिझनेस अॅप्लिकेशन सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड आणि अलीकडेच 'अमेरिका १' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजिक मार्केट्स युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे. थिएरी डेलापोर्टे यांचा कार्यकाळ २०२५ रोजी संपणार होता. मात्र, मुदतीआधीच त्यांनी राजीनामा दिल्यानं पल्लिया यांच्याकडं ही जबाबदारी आली आहे.
पल्लिया हे अमेरिकेत राहणार असून ते विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांना रिपोर्ट करतील. पल्लिया यांच्या पॅकेजमध्ये सुमारे २.५ कोटींच्या मूळ वेतनाचा समावेश आहे. तसंच, दरवर्षी तितक्याच रकमेच्या टार्गेट व्हेरिएबल पेचाही समावेश आहे. व्हेरिएबल पेचा निर्णय कंपनीचा महसूल, नफा आणि इतर निकषांशी संबंधित असेल. याचा निर्णय कंपनीचं संचालक मंडळ घेईल. पल्लिया हे सर्वाधिक वेतन घेणारे दुसऱ्या क्रमांकाचे सीईओ ठरणार आहेत. सध्या इन्फोसिसचे सीईओ हे सलील पारेख हे पॅकेजच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचं वर्षाचं पॅकेज ५६ कोटी रुपये आहे.
पल्लिया यांना एकूण ४ दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई शेअर्सच्या स्वरूपात दिली जाईल. यात १.४ दशलक्ष डॉलर किमतीचे अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स, प्रतिबंधित स्टॉक युनिट्स आणि २.६ दशलक्ष डॉलर्सच्या ADS PSU चा समावेश असेल. हे शेअर्स तीन वर्षांमध्ये विभागून मिळतील. त्यातील २५ टक्के २०२४ मध्ये, २५ टक्के २०२६ मध्ये आणि उर्वरित ५० टक्के २०२७ मध्ये दिले जातील.
सेवा समाप्तीसाठी दोन्ही बाजूंकडून आगाऊ नोटीस देणं अपेक्षित आहे. पलिया यांनी कंपनी सोडल्यास त्यांना सहा महिन्यांची लेखी पूर्वकल्पना द्यावी लागेल किंवा नोटीस पीरियडच्या आधी जायचं असल्यास सहा महिन्यांच्या मूळ वेतनावर पाणी सोडावं लागेल.