मराठी बातम्या  /  बिझनेस  /  नव्या आणि जुन्या कर पद्धतीमध्ये फरक काय?; जाणून घ्या टॅक्स स्लॅबपासून सवलतीपर्यंत सर्वकाही

नव्या आणि जुन्या कर पद्धतीमध्ये फरक काय?; जाणून घ्या टॅक्स स्लॅबपासून सवलतीपर्यंत सर्वकाही

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 08, 2024 05:15 PM IST

New Tax regime vs Old Tax Regime : कोणत्या कर पद्धतीनुसार कर भरल्यास अधिक फायदा मिळू शकतो? किती आहे टॅक्स स्लॅब? पाहूया

नव्या आणि जुन्या कर पद्धतीमध्ये फरक काय?; जाणून घ्या टॅक्स स्लॅबपासून सवलतीपर्यंत सर्वकाही
नव्या आणि जुन्या कर पद्धतीमध्ये फरक काय?; जाणून घ्या टॅक्स स्लॅबपासून सवलतीपर्यंत सर्वकाही

Income Tax : आर्थिक वर्ष संपल्यानंतर आता करदाते हळूहळू कर विवरण पत्र भरण्याच्या तयारीला लागतील. कर वाचवण्यासाठी कोणती गुंतवणूक करायची याचा विचार मार्च महिन्यात करून झाल्यानंतर आता कोणत्या कर पद्धतीचा वापर करू कर भरायचा ह्यावर मंथन सुरू होईल. अशा करदात्यांना आम्ही नव्या आणि जुन्या कर प्रद्धतीची संक्षिप्त माहिती देणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

नवीन कर प्रणाली आणि जुन्या कर प्रणालीमध्ये नेमका काय फरक आहे? टॅक्स स्लॅब किती आहे आणि फायदा किती आहे? सीए अजय बगाडिया, सीए संतोष मिश्रा आणि अभिनंदन पांडे यांच्याकडून ही गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न करूया...

सीए संतोष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कर पद्धती २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून डीफॉल्ट प्रणाली बनली आहे. त्यामुळं तुम्हाला जुन्या कर पद्धतीची निवड करायची असल्यास, तुम्हाला आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या कंपनीला तशी सूचना द्यावी लागेल. 

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या इन्कम टॅक्स स्लॅबवर टाकूया एक नजर…

जुन्या कर पद्धतीनुसार, अडीच लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. तुमचं उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंवा ४,९९,९९९ रुपये असेल तरीही तुम्हाला शून्य कर लागेल. मात्र, तुम्ही ही मर्यादा ओलांडताच, २,५०,००१ रुपयांवरून मोजला जाईल. म्हणजेच २,५०,००१ ते ५,००,००० रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला ५ टक्के कर भरावा लागेल. ५,००,००१ ते १० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के आणि १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर २० टक्के कर लागेल.

जुन्या कर पद्धतीनुसार, एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या वैयक्तिक करदात्यांना १२,५०० रुपयांची कर सवलत किंवा प्रत्यक्ष देय कर, यापैकी जी रक्कम कमी असते तेवढी सूट मिळते. 

६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपयांपर्यंत कर माफ आहे, तर ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मूळ सूट मर्यादा ५ लाख रुपये आहे.

नवीन कर पद्धतीमध्ये आयकर स्लॅब

नव्या कर पद्धतीमध्ये ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कसलाही कर नाही. ३ लाखांपेक्षा जास्त आणि ६ लाखांपेक्षा कमी उत्पन्नावर ५ टक्के कर आहे. ६ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ९ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी १० टक्के आणि ९ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी १५ टक्के कर आहे. १२ लाखांपेक्षा जास्त आणि १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्नावर २० टक्के कर आहे. १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी ३० टक्के कर आहे.

सीए अजय बगाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कर प्रणालीमध्ये तब्बल ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. तर, ७ लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना किरकोळ सवलत उपलब्ध आहे.

सूट, सवलत, वजावट

जुन्या आणि नवीन आयकर पद्धतीतील महत्त्वाचा फरक हा आहे की जुन्या पद्धतीमध्ये कलम ८० सी, कलम ८० डी, कलम ८०टीटीए अंतर्गत मोठ सूट आणि कपात क्लेम करता येते. तर, नवीन कर पद्धतीत अशी कुठलीही सोय नाही, असं सीए अभिनंदन पांडे यांनी सांगितलं.

प्रमाणित वजावट (standard deduction)

२०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी प्रमाणित वजावट 'जैसे थे' राहणार आहे. जुन्या आणि नवीन दोन्ही कर पद्धतींसाठी ती ५० हजार रुपये राहील. प्रमाणित वजावटीच्या व्यतिरिक्त नवीन कर पद्धतीमध्ये एका अतिरिक्त वजावटीची सुविधा मिळते. एनपीएस खात्यामधील योगदानासाठी कलम ८०सीसीडी(२) अंतर्गत ती मिळते, अशी माहिती सीए अजय बागडिया यांनी दिलीय

WhatsApp channel

विभाग