long term investment : शेअर बाजारातील लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची नेमकी व्याख्या काय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  long term investment : शेअर बाजारातील लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची नेमकी व्याख्या काय?

long term investment : शेअर बाजारातील लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची नेमकी व्याख्या काय?

Jul 17, 2024 06:04 PM IST

what is long term investment : शेअर मार्केटमध्ये 'लाँग टर्म' इन्व्हेस्टमेंटची नेमकी व्याख्या काय? जाणून घेऊया

लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची व्याख्या काय? ही इन्व्हेस्टमेंट नेमकी किती वर्षांची असावी? वाचा
लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची व्याख्या काय? ही इन्व्हेस्टमेंट नेमकी किती वर्षांची असावी? वाचा

what is long term investment : गुंतवणूक हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. ही गुंतवणूक करताना वैयक्तिक उद्दिष्टे आणि कालमर्यादा या दोन गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. गुंतवणूक इक्विटीमधील असो, डेट फंडमधील असो किंवा इतर मालमत्तेतील असो, त्यातून योग्य परतावा मिळवायचा असेल व जोखीम कमी करायची असेल तर योग्य दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे.

जेव्हा गुंतवणुकीचा विचार केला जातो, तेव्हा कालमर्यादा महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही. मुदत ठेवींपासून रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंडापर्यंत सर्वच बाबतीत हे लागू आहे. मुदत ठेवींमध्ये केलेली गुंतवणूक मॅच्युरिटी कालावधीच्या आधी काढल्यास त्यावर दंड भरावा लागतो. साहजिकच व्याजातून मिळणारं उत्पन्न कमी होतं. त्याचप्रमाणे, शेअर मार्केटमध्ये पुरेसा वेळ न देता गुंतवणूक काढून घेणं अनेकार्थांनी मारक ठरू शकतं.

शेअर मार्केटमधील लाँग टर्म संकल्पना

इक्विटी मार्केटमधील गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठी असावी असं म्हटलं जातं. वॉरन बफे यांच्यापासून ते भारतातील दिग्गज गुंतवणूक गुरू देखील लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा सल्ला देतात. पण 'लॉन्ग टर्म' म्हणजे नेमकं काय? ही गुंतवणूक नेमकी किती वर्षांसाठी असावी? चला समजून घेऊया…

शॉर्ट टर्मच्या तुलनेत लाँग टर्म गुंतवणुकीत कमी जोखीम असते असं जे म्हटलं जातं, त्यात तथ्य नाही. खरंतर, गुंतवणूक अल्प कालावधीची असो की दीर्घ कालावधीची त्यात जोखीम सारखीच असते. बाजारात अस्थिरता कधी येईल हे सांगता येत नाही. मंदी कधीही येऊ शकते. फरक इतकाच की दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला मिळण्याची शक्यता जास्त असते.

दीर्घ काळातील कंपाउंडिंगमुळं गुंतवणूकदार महागाई दर आणि बाजारातील मंदीला मागे टाकणारा परतावा मिळवू शकतात. सरकारी कर रचनेच्या आधारे पाहिल्यास १ वर्षांपेक्षा कमी कालावधी हा शॉर्ट टर्म असतो. कारण, या कालावधीतील परताव्यावर शॉर्ट टर्म टॅक्स लागतो. याउलट एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या गुंतवणुकीवर लाँग टर्म टॅक्स लागतो. मात्र, प्रत्येक गुंतवणूकदार आपापल्या पद्धतीनं हा कालावधी ठरवत असतो.

ऐतिहासिक आकडेवारीनुसार, १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या गुंतवणुकीतून तोटा होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात कमी होते. त्यामुळं हा कालावधी इक्विटीसाठी अत्यंत अनुकूल ठरतो. उदाहरणार्थ, एका दिवसात तुम्हाला इक्विटीमध्ये तोटा होण्याची शक्यता ४६ टक्के असते आणि १० वर्षांत ही शक्यता जवळपास ० टक्के असते. पुढील तक्ता पाहा…

कालावधीनकारात्मक परताव्याची शक्यता
१ दिवस४६ टक्के
१ महिना३८ टक्के
६ महिने३५ टक्के
१ वर्ष२४ टक्के
३ वर्षे७ टक्के
५ वर्षे०.१ टक्के
१० वर्षे० टक्के

१० वर्षांत १० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिल्याची उदाहरणे ८३ टक्क्यांहून अधिक आहेत. पुढील तक्ता पाहा…

कालावधी१० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा
१ दिवस० टक्के
१ महिना६ टक्के
६ महिने४० टक्के
१ वर्ष५७ टक्के
३ वर्षे६६ टक्के
५ वर्षे७३ टक्के
१० वर्षे८३ टक्के

वरील तक्ता जून १९९९ पासून निफ्टी ५० निर्देशांकावर आधारित.

योग्य गुंतवणूक धोरण तयार करणे!

गुंतवणुकीचं योग्य नियोजन करण्यासाठी उद्दिष्टे आणि कालमर्यादा या दोन्हींचा काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. दीर्घकालीन संपत्ती संचय करण्याच्या उद्देशाने केलेली इक्विटी गुंतवणूक असो किंवा अल्प ते मध्यम मुदतीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तयार केलेले डेट फंड असोत, आपली गुंतवणूक योग्य कालमर्यादेशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे.

(डिस्क्लेमर : या लेखातील तज्ज्ञांची मते व सूचना त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या नाहीत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

(या लेखाचे लेखक निरंजन अवस्थी हे एडलवाइज अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)

Whats_app_banner