मराठी बातम्या  /  बिझनेस  /  share market news : गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! आता नो वेटिंग! ट्रेडिंगच्या दिवशीच पैसे खात्यात येणार

share market news : गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! आता नो वेटिंग! ट्रेडिंगच्या दिवशीच पैसे खात्यात येणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 18, 2024 11:20 AM IST

Share settlement system news : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खूषखबर आहे. यापुढं शेअर विकल्यानंतर गुंतवणूकदारांना पैशासाठी एक दिवसही वाट बघावी लागणार नाही.

गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! आता वाट बघण्याची गरज नाही! शेअर विकल्याच्या दिवशीच खात्यात येणार पैसे
गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! आता वाट बघण्याची गरज नाही! शेअर विकल्याच्या दिवशीच खात्यात येणार पैसे

Share settlement system news : शेअर बाजार नियामक मंडळ अर्थात, सेबीनं (SEBI) शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार, आता शेअरच्या व्यवहारांसाठी 'टी प्लस झिरो' (T+0) ही पद्धत लागू होणार आहे. म्हणजेच, ज्या दिवशी शेअर्स विकले जातील, त्याच दिवशी पैसे ग्राहकाच्या खात्यात येतील. येत्या २८ मार्चपासून ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल.

सुरुवातीला २५ शेअर्ससाठी

या नवीन पद्धतीसाठी सेबीनं T+0 सेटलमेंट सिस्टमची बीटा आवृत्ती प्रायोगिक तत्वावर लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सध्या ही पद्धत २५ शेअर्ससाठी लागू होईल आणि काही ठराविक ब्रोकरच त्याचा वापर करू शकतील.

नव्या पद्धतीनुसार व्यवहार सुरळीत होतात की नाही हे पुढील तीन ते सहा महिने पाहिलं जाईल. त्यानंतर T+0 प्रणाली पुढं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. या नव्या नियमामुळं बाजारात तरलता (Liquidity) वाढेल आणि जोखीमही कमी होईल, असा विश्वास सेबीनं व्यक्त केला आहे.

सध्याची पद्धती काय?

सध्या शेअर बाजारात T+1 सेटलमेंट पद्धती लागू आहे. टी म्हणजे ज्या दिवशी व्यवहार झाला तो दिवस अर्थात ट्रेडिंग डे. आणि एक म्हणजे व्यवहारा पूर्ण होण्यासाठी लागणारा दिवस. म्हणजेच, ज्या दिवशी तुम्ही शेअर्स खरेदी करता किंवा विकता त्याच्या दुसऱ्या दिवशी पैसे खात्यात येतात.

नव्या पद्धतीचा कसा होईल लाभ?

T+0 प्रणालीमध्ये शेअरचा व्यवहार त्याच दिवशी सेटल होईल. म्हणजे एखाद्या गुंतवणूकदारानं सकाळी शेअर्स विकले तर संध्याकाळपर्यंत त्याच्या खात्यात रक्कम जमा होईल. सेबीनं T+0 पद्धती दोन टप्प्यात लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत व्यवहार झाल्यास साडेचार वाजेपर्यंत तो पूर्ण जाईल. तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्व व्यवहारांसाठी पर्यायी सेटलमेंट सुविधा उपलब्ध असेल.

खरेदी शुल्कात कपात

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनं (NSE) रोख आणि फ्युचर्स सेगमेंटमधील व्यवहारांसाठीचं शुल्क एक टक्क्यानं कमी केलं आहे. ही वजावट १ एप्रिलपासून लागू होणार आहे. या निर्णयाचा थेट फायदा गुंतवणूकदारांना मिळणार आहे. ते स्वस्तात शेअर्स खरेदी-विक्री करू शकतील.

एनएसईच्या या निर्णयाचा वार्षिक उत्पन्नावर सुमारे १३० कोटी रुपयांचा परिणाम होणार आहे. या कपातीशिवाय एनएसईनं तंत्रज्ञान आणि शिक्षण यासारख्या इतर व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. या निर्गुंतवणूक प्रक्रियेत ६० पक्षांनी स्वारस्य दाखवलं असून सात जणांनी बोली लावल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग