What is IPO : आर्थिक विषयाची आवड असलेल्या व नसलेल्याही लोकांनी आयपीओ (IPO) हा शब्द कधी ना कधी ऐकला असेल. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यापासून म्हणजे गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळं साहजिकच हा शब्दही सतत कानावर पडत आहे. कारण आयपीओ हा शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक मार्ग आहे. काय आहे या शब्दाचा अर्थ? जाणून घेऊया सर्व काही…
आयपीओ म्हणजे इंग्रजीत इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) अर्थात प्रारंभिक भागविक्री. एखादी कंपनीला जेव्हा काही कारणांसाठी, उदा. आपल्या भावी प्रकल्पांत पैसे गुंतवण्यासाठी, इक्विटी भांडवल वाढवण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी पैशांची गरज लागते तेव्हा ती कंपनी आयपीओचा पर्याय निवडते. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ठराविक शेअर्स विक्रीला काढते.
आयपीओ आणण्यासाठी कोणत्याही कंपनीला आधी भांडवली बाजार नियामक संस्था अर्थात सेबीची परवानगी घ्यावी लागते. नियमानुसार सर्व कागदपत्रे व अटींची पूर्तता करावी लागते. त्यानंतर आयपीओ बाजारात येतो. आयपीओतील शेअरचा लॉट आणि किंमत ठरलेली असते. हा आयपीओ ठराविक दिवशी सबस्क्रिप्शनसाठी खुला होतो आणि काही दिवस खुला असतो. इच्छुक गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करू शकतात.
वेगळ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, आयपीओ ही प्राइव्हेट कंपनीला आपल्या विस्तारासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उभारण्याची एक संधी असते. सुरुवातीला कोणतीही कंपनी संस्थापक, सुरुवातीचे गुंतवणूकदार व अन्य काही लोकांच्या आर्थिक सहभागानं सुरू होते. या नव्या कंपनीनं आपलं सुरुवातीचं उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर तिला विस्ताराचे वेध लागतात. सेबीचे नियम पाळून आपण सर्वसामान्यांच्या पैशातून भांडवल उभारू शकतो असा विश्वास कंपनीला वाटल्यास ती आयपीओचा निर्णय घेते. खासगी गुंतवणूकदारांच्या तुलनेत आयपीओद्वारे कंपनीला अधिकाधिक भांडवल उभे करता येते.
किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII)
बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII)
पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB)
अँकर गुंतवणूकदार
मूळ कंपनीचे भागधारक
कंपनीचे कर्मचारी (EMP)
आयपीओचे वाटप लॉटमध्ये होते. एका लॉटमध्ये कितीही शेअर असू शकतात. कंपनीच्या आयपीओचा आकार, इश्यू प्राइस यावर लॉटचा आकार वेगवेगळा असतो. म्हणजेच एक लॉटमध्ये ६ शेअर असू शकतात, तसे १०० पेक्षा जास्त शेअरही असू शकतात.
आयपीओचं सबस्क्रिप्शन बंद झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी या आयपीओचं वाटप होतं. त्यानंतर हा शेअर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE), मुंबई शेअर बाजार (BSE) किंवा दोन्ही बाजारात सूचीबद्ध होतो. एकदा शेअर सूचीबद्ध झाला की कोणीही ते शेअर विकू शकतो. सर्वसामान्यपणे शेअरच्या किंमतीचा अंदाज घेऊन गुंतवणूकदार हा निर्णय घेत असतात.
ज्या कंपनीला भवितव्य आहे असा विश्वास वाटतो अशा कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येते. मात्र, त्यासाठी आपल्याला कंपनीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी असतो, अशा वेळी शेवटच्या दिवशी गुंतवणूक करावी असं तज्ज्ञ सांगतात. मधल्या कालावधीत कंपनीशी संबंधित बरीच माहिती येत असते. त्या आयपीओला कसा प्रतिसाद आहे हे देखील समजत असते. सामान्य गुंतवणूकदारांनी या सगळ्याचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा.
संबंधित बातम्या