Kumbh Mela and Sensex : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभमेळ्याची सुरुवात झाली. तर, दुसरीकडं भारतीय शेअर बाजार १ हजार अंकांनी गडगडला. अर्थ आणि धर्म या दोन तशा परस्परभिन्न गोष्टींचा संबंध काय असा प्रश्न कुणालाही सहज पडेल. मात्र, गेल्या २० वर्षांचा इतिहास आणि आकडेवारी तरी हेच सांगते. मागच्या २० वर्षांत कुंभमेळ्याच्या काळात सेन्सेक्सनं कायम नकारात्मक परतावा दिल्याचं दिसून आलं आहे.
सॅमको सिक्युरिटीजचे मार्केट पर्सपेक्टिव्ह अँड रिसर्च हेड अपूर्व शेठ यांनी केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या सहा कुंभमेळ्यात सेन्सेक्सनं नकारात्मक परतावा दिला आहे.
कुंभ हा एक प्रमुख हिंदू तीर्थ उत्सव आहे. जगभरातील लाखो भाविक कुंभमेळा पाहण्यासाठी किंवा स्नानासाठी इथं गर्दी करतात. प्रयागराज (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभमेळा साजरा केला जातो.
प्रयागराज इथं दर १२ वर्षांनी एकदा महाकुंभ होतो. याचा संबंध गुरू ग्रहाशी असल्याचं मानलं जातं. गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंदाजे १२ वर्षे लागतात. जेव्हा गुरू विशिष्ट राशींमध्ये प्रवेश करतो आणि विशिष्ट खगोलीय रचनांमध्ये सूर्य आणि चंद्राशी संरेखित होतो तेव्हा महाकुंभ होतो. यावर्षी महाकुंभमेळा १३ जानेवारीपासून सुरू झाला असून २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपणार आहे.
२००४ मध्ये कुंभमेळ्याच्या काळात सेन्सेक्स ३.२७ टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर दोन वेळा म्हणजे २०१० आणि २०१३ मध्ये सेन्सेक्स १ टक्क्यांहून अधिक घसरला. २०१५ मध्ये सेन्सेक्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. गेल्या २० वर्षांतील कुंभमेळ्यातील ही सर्वात मोठी घसरण होती. यावेळी गुंतवणूकदारांनी बरेच पैसे गमावले. २०१६ च्या कुंभमेळ्यात सेन्सेक्स २ टक्क्यांनी घसरला होता आणि २०२१ च्या कुंभमेळ्यात तो ४ टक्क्यांनी खाली आला.
कुंभमेळ्यादरम्यान भाविक पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारतात. असं केल्यानं आपलं पाप धुवून जाईल अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे, तेजीच्या काळात योग्य मूल्यांकन आणि मूलभूत घटकांकडं होत असलेल्या दुर्लक्षाचं ‘प्रायश्चित्त’ म्हणून शेअर बाजारही डुबकी मारतो. स्वत:च्या योग्य जागेवर येतो, असं दिसतं.
दिग्गज गुंतवणूकदारांसाठीही कुंभमेळा आशेचा किरण घेऊन येतो. जेव्हा बाजार वेगानं वाढत असतो, तेव्हा चुका होण्याची दाट शक्यता असते आणि झटपट नफ्याच्या आशेनं मोठे व्यवहार केले जातात. दुर्दैवानं, करेक्शन किंवा क्रॅश होईपर्यंत गुंतवणूकदारांना त्यांच्या चुका लक्षात येत नाहीत. हे करेक्शन म्हणजे पवित्र पाण्यात डुबकी मारण्यासारखंच असतं. नव्यानं सुरुवात करण्यासाठी ही संधी असते, असं अपूर्व शेठ यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमागे अनेक कारणं असली तरी कुंभमेळ्यादरम्यान सांस्कृतिक वातावरण आणि आर्थिक बदलांमुळं उपभोगाच्या पद्धतीत तात्पुरते बदल होऊ शकतात आणि काही क्षेत्रांतील आर्थिक हालचाली कमी होऊ होतात, याकडं शेठ यांनी लक्ष वेधलं.
कुंभ मेळ्यासारखे उत्सव नकळत गुंतवणूकदारांच्या वर्तणुकीवर परिणाम करू शकतात आणि त्यातून जोखीम न घेता सावध वर्तनात वाढ होऊ शकते, असंही शेठ यांनी म्हटलं आहे.
'गुरू ग्रहाचं १२ वर्षांचं भ्रमण आणि कुंभमेळ्याशी त्याचा संबंध आपल्याला आठवण करून देतो की मानवी वर्तनाप्रमाणेच बाजारपेठेवर देखील तर्कशुद्ध अर्थशास्त्राच्या पलीकडच्या घटकांचा प्रभाव असतो. कुंभमेळ्यादरम्यान अधिक सावध धोरण अवलंबण्याचे संकेत म्हणून ऐतिहासिक कमकुवत कामगिरीचा विचार करून गुंतवणूकदार या सहसंबंधातून धडा घेऊ शकतात, असं शेठ म्हणाले.
संबंधित बातम्या