Personal loan : वैयक्तिक कर्ज म्हणजे नेमकं काय? काय आहेत फायदे-तोटे? जाणून घ्या सर्व काही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Personal loan : वैयक्तिक कर्ज म्हणजे नेमकं काय? काय आहेत फायदे-तोटे? जाणून घ्या सर्व काही

Personal loan : वैयक्तिक कर्ज म्हणजे नेमकं काय? काय आहेत फायदे-तोटे? जाणून घ्या सर्व काही

Mar 20, 2024 06:01 PM IST

Personal loan pros and cons : वैयक्तिक कर्ज घेण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. बरेच कर्जदार त्याकडं दुर्लक्ष करतात. जाणून घेऊया सर्वकाही…

पर्सनल लोन म्हणजे नेमकं काय? काय आहेत फायदे-तोटे? जाणून घ्या सर्व काही
पर्सनल लोन म्हणजे नेमकं काय? काय आहेत फायदे-तोटे? जाणून घ्या सर्व काही

Personal loan pros and cons : पर्सनल लोन तथा वैयक्तिक कर्ज म्हणजे बँका किंवा पतसंस्थांसारख्या संस्थांकडून मिळणारं असुरक्षित श्रेणीतील कर्ज. या प्रकारात एखादी ठराविक रक्कम उसनी घेऊन विशिष्ट वेळेत आणि पूर्वनियोजित हप्त्यामध्ये व्याजासह परत करावी लागते. 

पर्सनल लोन ऑनलाइन घेणं अधिक सोप्पं आणि सोयीस्कर ठरतं. कर्ज देणाऱ्या बँकेच्या वेबसाइटवर किमान वेतन आणि क्रेडिट स्कोअर सारख्या पात्रतेच्या निकषांचे पुरावे अपलोड करून या कर्जाची मागणी करता येते. विविध कर्जदात्यांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याज दर, शुल्क आणि इतर अटींची तुलना करण्यासाठी ऑनलाइन माहिती मिळवता येते. 

योग्य कर्जदार निवडल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्या बँकेच्या वेबसाइटवर जा. प्राथमिक माहिती, रोजगाराचा तपशील आणि उत्पन्नाचा पुरावा सादर करा. याशिवाय, बँकेच्या आवश्यकतेनुसार आपलं पॅन कार्ड, पगाराची स्लीप आणि बँक स्टेटमेंट सारख्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी सादर करण्याची तयारी ठेवा.

वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये

संकटकाळात किंवा तातडीचा निधी उभा करणं हे एक मोठं आव्हान असतं. मग प्रसंग अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणी असो किंवा अचानक निघालेलं लग्न असो. वैयक्तिक कर्ज आपल्या आयुष्यातील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतं. वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडण्याचे अनेक फायदे आहेत. 

वैयक्तिक कर्जाचे फायदे

 

तारणाची गरज नाही!

वैयक्तिक कर्जांमध्ये कुठली वस्तू, सोने किंवा मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळं सुरक्षित कर्जाच्या तुलनेत ही कर्ज मिळणं अधिक सुलभ असतं. 

वापरावर निर्बंध नाही!

वैयक्तिक कर्जाच्या रूपानं मिळणाऱ्या पैशाचा वापर कोणत्याही खर्चासाठी केला जाऊ शकतो. उदा. इतर कर्ज फेडणे, अनपेक्षित खर्च भागवणे, घरात दुरुस्ती करणे किंवा काही महत्त्वाची खरेदी करणे.

स्थिर व्याजदर

वैयक्तिक कर्जाचा व्याजदर कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी स्थिर राहतो. त्यामुळं आपल्याला मासिक बजेट आखणं सोपं जातं.

कर्जाचा कालावधी

वैयक्तिक कर्जाचा कालावधी सर्वसाधारणपणे एक ते सात वर्षांपर्यंत असतो.

मर्यादित कागदपत्रे

इतर प्रकारच्या कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कमी कागदपत्रे लागतात.

वैयक्तिक कर्जाचे तोटे

वैयक्तिक कर्जाचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटेही आहेत. हे कर्ज घेण्यासाठी काहीही गहाण ठेवावं लागत नाही, त्यामुळं हे कर्ज म्हणजे कर्जदारासाठी एक जोखीम असते. ती जोखीम अन्य काही मार्गांनी कमी केली जाते.

जास्त व्याजदर

सुरक्षित कर्जाच्या प्रकारात एखाद्यानं कर्ज बुडवल्यास गहाण ठेवलेल्या वस्तूच्या किंवा मालमत्तेतून त्याची भरपाई करता येते. वैयक्तिक कर्जात काहीही गहाण ठेवलेले नसते. त्यामुळं घर किंवा वाहनाच्या कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज महाग असतं. या कर्जावर जास्त व्याज आकारलं जातं.

पात्रता निकष कठोर

वैयक्तिक कर्जामध्ये सामान्यत: फारशी कागदपत्रे लागत नाहीत हे खरं असलं तरी कर्ज देणारी बँक क्रेडिट स्कोअर व उत्पन्नाच्या बाबतीत कठोर अटी लागू करू शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

एकरकमी कर्ज फेडता येतं का? त्यासाठी किती शुल्क लागतं?

कर्जाची संपूर्ण रक्कम आणि शुल्क दिल्यानंतर कर्जाची फाइल बंद केली जाते. बऱ्याच बँका एकरकमी सेटलमेंटसाठी शुल्क आकारत नाहीत. अर्थात, शुल्कासंबंधी प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असू शकतात.

नोकरी बदलल्यानं ईएमआय बदलतो का?

असं कोणतंही बंधन नाही. तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात असल्यास तुम्ही नोकरी बदलणं हे दुय्यम ठरतं. मात्र, संबंधितांना कोणत्याही बदलांची माहिती करून देणं चांगलं असतं, जेणेकरून ते आपलं कर्ज अधिक लवकर सेटल करण्यासाठी उपाय सुचवू शकतात.

पर्सनल लोनसाठी ऑनलाइन अर्जाचे फायदे काय?

ऑनलाइन अर्जामुळं आपल्याला हवी तेव्हा, प्रत्येक गोष्टीची माहिती घेता येते. आपल्या कर्जाची सध्याची स्थिती काय आहे तेही पाहता येतं. अनेक बँका आणि बिगर बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) ग्राहकांना तात्काळ आणि पुरेशी माहिती देण्यासाठी ऑनलाइन कर्जाला प्रोत्साहन देतात. 

जॉइंट पर्सनल लोनसाठी अर्ज करता येतो का?

वैयक्तिक कर्जासाठी सह-अर्जदारासह संयुक्त अर्ज करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळं उत्पन्नाचा निकष पूर्ण करण्यासाठी मदत होतेच, शिवाय मोठ्या रकमेच्या कर्जासाठी पात्र ठरता येतं.

Whats_app_banner