Bonus Share Explained : बोनस शेअर्स म्हणजे काय? ते का आणि कोणाला दिले जातात? जाणून घ्या सर्वकाही-what is a bonus share why do companies issue bonus shares here are the details ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus Share Explained : बोनस शेअर्स म्हणजे काय? ते का आणि कोणाला दिले जातात? जाणून घ्या सर्वकाही

Bonus Share Explained : बोनस शेअर्स म्हणजे काय? ते का आणि कोणाला दिले जातात? जाणून घ्या सर्वकाही

Jan 03, 2024 01:56 PM IST

Bonus share explained : शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या काही कंपन्यांकडून आपल्या शेअरहोल्डरना बोनस शेअर दिले जातात. काय असतो हा प्रकार? जाणून घेऊया…

Bonus Share
Bonus Share

Understanding Bonus Share : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी तिथल्या सर्व खाचाखोचा माहीत असणं गरजेचं असतं. त्या माहीत असल्यास गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवता येतो किंवा होणारा तोटा कमी करता येतो. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या कानावर रोजच्या रोज डिविडंड, स्टॉक स्प्लिट, राइट्स इश्यू, पेनी स्टॉक आणि बोनस शेअर असे अनेक शब्द पडत असतात. यापैकी बोनस शेअर ही संकल्पना काय असते ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया…

बोनस शेअर म्हणजे काय?

बोनस शेअर या नावातच याचा बराच अर्थ सामावलेला आहे. बोनस शेअर हा एक प्रकारचा बोनस असतो. मात्र, तो शेअरच्या स्वरूपात असतो. एखादी कंपनी आपल्याला भागधारकांना बोनस म्हणून अतिरिक्त शेअर देत असते. या शेअरसाठी कुठलेही वेगळे पैसे आकारले जात नाहीत. त्यालाच बोनस शेअर, बोनस इश्यू, स्क्रीप इश्यू किंवा कॅपिटलायझेशन इश्यू असंही म्हणतात.

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

बोनस शेअर्सची घोषणा नेहमी एका विशिष्ट गुणोत्तरामध्ये केली जाते. उदाहरणार्थ, १:२, १:३ किंवा ३:१ असं हे कोणतंही प्रमाण असू शकतं. एखाद्या कंपनीनं १:२ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केल्यास कंपनीच्या शेअरहोल्डरला त्याच्याकडं असलेल्या एका शेअरमागे दोन शेअर मिळतात. म्हणजेच, त्याच्याकडं आधीपासून १०० शेअर असतील तर त्याला २०० बोनस शेअर मिळून त्याच्याकडील एकूण शेअरची संख्या ३०० रुपये होईल.

बोनस शेअर का दिले जातात?

बोनस शेअर द्यायचा की नाही? दिला तर तो किती प्रमाणात द्यायचा? हा पूर्णपणे कंपनीचा निर्णय असतो. परिस्थितीनुसार कंपनीचं संचालक मंडळ या संदर्भातील निर्णय घेत असते. बोनस शेअर देण्यामागे अनेक कारणं असू शकतात. 

कंपनीसोबत असलेल्या गुंतवणूकदारांना कायम राखण्याबरोबरच नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करणं हा बोनस शेअरचा एक प्रमुख हेतू असतो.

गुंतवणूकदारांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्या गुंतवणुकीचा मोबदला देणं हा देखील एक हेतू असतो.

Penny Stocks Explained : पेनी स्टॉक म्हणजे काय? त्यातील गुंतवणूक खरंच फायद्याची असते?

लाभांशाला पर्याय म्हणून देखील बोनस शेअर दिले जातात. असं केल्यामुळं कंपनीच्या रोख राखीव रकमेवर कुठलाही परिणाम होत नाही.

कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असून आपल्या गुंतवणूकदारांना नफा मिळवून देण्याची कुवत आहे हा संदेश बोनस शेअरच्या माध्यमातून कंपनी देत असते.

पैशाच्या स्वरूपात मिळणाऱ्या लाभांशावर गुंतवणूकदारांना टॅक्स द्यावा लागतो. मात्र बोनस शेअरवर असा कुठलाही कर लागत नाही. अर्थात, हे शेअर विकल्यानंतर झालेल्या नफ्यावर दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स लागतो.

Penny Stocks Explained : पेनी स्टॉक म्हणजे काय? त्यातील गुंतवणूक खरंच फायद्याची असते?

बोनस शेअरचा तोटा काय?

बोनस शेअर हे विनामूल्य अतिरिक्त दिले जाणारे शेअर असल्यामुळं कंपनीकडं त्यातून कुठलीही कॅश येत नाही. त्यामुळं भविष्यातील लाभांश दिला जाण्याची शक्यताही कमी होते. यामुळं गुंतवणूकदार निराश होऊ शकतात.

लाभांशामुळं गुंतवणूकदाराच्या खिशात थेट पैसे येतात. बोनस शेअरमुळं लगेच असा कुठलाही फायदा होत नाही. खात्यातील शेअरची संख्या वाढत असली तरी त्या प्रमाणात शेअरचं मूल्य कमी होतं. उदा. एखाद्या व्यक्तीकडं प्रति शेअर १० रुपये मूल्य असलेले १०० शेअर आहेत. संबंधित कंपनीनं १:१ बोनस दिल्यास त्याच्याकडील शेअरची संख्या २०० रुपये होते. मात्र, शेअरचं मूल्य १० वरून ५ वर येते. त्यामुळं प्रत्यक्षात गुंतवणूकदाराला आर्थिक लाभ होत नाही.

बोनस शेअर देण्याऐवजी कंपनी आपलं उत्पन्न कंपनीच्या विस्तारावर व नव्या प्रकल्पांवर खर्च करू शकते. त्याचा जास्त फायदा भविष्यात गुंतवणूकदारांना होऊ शकतो.

बोनस शेअर दिल्यामुळं कंपनीच्या शेअरची संख्या वाढते, मात्र कंपनीच्या एकूण बाजार भांडवलावर काहीही परिणाम होत नाही.

बोनस शेअरसाठी पात्रतेचे निकष

बोनस इश्यू जाहीर केल्यानंतर कंपनी प्रत्यक्ष बोनस देण्याची तारीख जाहीर करते, ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून ओळखली जाते. रेकॉर्ड तारखेला ज्यांच्याकडं शेअर असतात ते बोनस शेअरसाठी पात्र ठरतात.

Whats_app_banner