Mutual Fund : हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणजे काय? कोणी करावी गुंतवणूक? काय आहेत फायदे? वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund : हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणजे काय? कोणी करावी गुंतवणूक? काय आहेत फायदे? वाचा!

Mutual Fund : हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणजे काय? कोणी करावी गुंतवणूक? काय आहेत फायदे? वाचा!

Published Feb 12, 2025 03:48 PM IST

Hybrid Fund Marathi News : म्युच्युअल फंडाचा एक प्रकार असलेला हायब्रिड फंड नेमका काय असतो? कोणाला आणि कसा होऊ शकतो त्याचा फायदा? वाचा!

हायब्रीड म्युचुअल फंड म्हणजे काय? कोणी करावी गुंतवणूक? काय आहेत फायदे? वाचा!
हायब्रीड म्युचुअल फंड म्हणजे काय? कोणी करावी गुंतवणूक? काय आहेत फायदे? वाचा!

Hybrid Mutual Fund : शेअर बाजारात व अन्य प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा म्युच्युअल फंड हा अलीकडचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक सातत्यानं वाढत आहे. म्युच्युअल फंडांचेही अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकारांचेही अनेक पोटप्रकार आहेत. 

हायब्रीड फंड हा असाच म्युच्युअल फंडाचा लोकप्रिय उपप्रकार आहे. या फंडाच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त मालमत्ता श्रेणीत (Asset Class) गुंतवणूक करता येते. हे फंड इक्विटी आणि डेट फंडाचं मिश्रण असतात. काही वेळा सोने किंवा अगदी रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रांतही या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते.

हायब्रीड फंड कसे काम करतात?

> हायब्रीड फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास मदत करतात.

> बाजारातील जोखीम नियंत्रित करण्यात मदत करू शकतात आणि तुलनेनं स्थिर नफा मिळवून देऊ शकतात.

> निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील आर्थिक नियोजनासाठी तो एक चांगला पर्याय असू शकतो.

> गुंतवणुकीच्या क्षेत्रात नवीन असणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. कारण, या फंडातील इक्विटी गुंतवणूक वाढीची हमी देते तर, वैविध्यता स्थिर-उत्पन्नाचा आधारही देते.

हायब्रीड फंडांचा विचार कोणी करावा?

> ज्या गुंतवणूकदारांना जोखीम आणि परताव्यात समतोल साधायचा आहे.

> नियमित उत्पन्न किंवा संपत्ती वाढ हवी असणाऱ्यांसाठी हा फंड चांगला ठरू शकतो.

> कमी किंवा मध्यम जोखीम घेऊ शकणारे गुंतवणूकदार

हायब्रीड फंड कसा निवडायचा?

> तुमची आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणुकीचा काळ आणि जोखीम घेण्याची क्षमता विचारात घ्या.

> तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि परताव्याची अपेक्षा यांचा ताळमेळ बसवा.

> किमान अस्थिरता आणि चढ-उतारांच्या वातावरणात योग्य वेळी इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारा फंड निवडावा.

हायब्रीड म्युच्युअल फंडाचे प्रकार

प्रत्येक हायब्रीड फंडामध्ये इक्विटी आणि डेटमध्ये भिन्न मालमत्ता वाटप असू शकते, त्यांचे खालील प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते:

इक्विटी-ओरिएंटेड हायब्रीड फंड 

हे फंड एकूण रकमेपैकी किमान ६५ टक्के रक्कम शेअर्स आणि शेअर्सशी संबंधित साधनांमध्ये गुंतवतात. उर्वरित ३५ टक्के रक्कम कर्ज रोखे आणि मनी मार्केटमध्ये गुंतवतात.

डेट-ओरिएंटेड हायब्रीड फंड

या फंडांतील एकूण मालमत्तेपैकी किमान ६० टक्के रक्कम बॉन्ड्स, डिबेंचर, सरकारी सिक्युरिटीज इत्यादी स्थिर-उत्पन्न सिक्युरिटीजमध्ये गुंतवली जाते. उर्वरित ४० टक्के शेअर्समध्ये गुंतवली जाते. काही फंड त्यांच्या निधीचा एक छोटासा भाग लिक्विड योजनांमध्येही गुंतवतात.

बॅलेन्स्ड फंड

हे फंड त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान ६५ टक्के रक्कम इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवतात आणि उर्वरित रक्कम डेट सिक्युरिटीज आणि रोख रकमेत गुंतवताता. कर आकारणीच्या वेळी हे फंड इक्विटी फंड मानले जातात आणि यातून मिळणाऱ्या १ लाखापर्यंतच्या दीर्घकालीन भांडवली उत्पन्नावर सूट मिळते.

मासिक उत्पन्न योजना

या प्रकारातले हायब्रीड फंड हे प्रामुख्यानं निश्चित उत्पन्न सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांच्याकडील रकमेचा एक छोटासा भाग इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांसाठी वाटप करतात. त्यामुळं गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न मिळतं. बऱ्याच योजनांमध्ये वाढीचा पर्याय देखील असतो. 

आर्बिट्राज फंड

आर्बिट्राज फंड हे एका मार्केटमध्ये कमी किमतीत स्टॉक खरेदी करतात आणि दुसऱ्या मार्केटमध्ये जास्त किमतीला विकतात. फंड मॅनेजर सतत आर्बिट्राजच्या संधी शोधतो आणि फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अधिकाधिक परतावा देण्याचा प्रयत्न करतो.

मात्र जेव्हा आर्बिट्राजच्या चांगल्या संधी उपलब्ध नसतात, तेव्हा हा फंड प्रामुख्यानं डेट सिक्युरिटीज आणि रोख रकमेत गुंतवणूक करतो. आर्बिट्राज फंड हे डेट फंडांइतकेच सुरक्षित मानले जातात. यातील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इक्विटी फंडांप्रमाणे कर आकारला जातो.

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner