Stock Market Updates : वारी एनर्जीज लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ग्रे मार्केटमध्ये वारी एनर्जीजचे शेअर्स जवळपास १०० टक्क्यांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. वारी एनर्जीजच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) पाहता हा शेअर बाजारात दिवाळी धमाका करण्याची शक्यता आहे.
येत्या सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी कंपनीचे शेअर बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणार आहेत. वारी एनर्जीजच्या शेअरची आयपीओ प्राइस १५०३ रुपये आहे. तर, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स १५०० रुपयांच्या प्रीमियमवर आहेत. ग्रे मार्केटमधील ही आकडेवारी लक्षात घेता वारी एनर्जीजचे शेअर्स ३००३ रुपयांच्या जवळपास लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स लागले आहेत, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी जवळपास १०० टक्के नफा होऊ शकतो.
वारी एनर्जीजचा एकूण पब्लिक इश्यू आकार ४३२१.४४ कोटी रुपये होता. आयपीओच्या आधी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ७१.८० टक्के होता, तो आता ६४.३० टक्के होणार आहे.
वारी एनर्जीजचा आयपीओ एकूण ७९.४४ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ११.२७ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत आयपीओ ६५.२५ पट सबस्क्राइब झाला. कंपनीचा आयपीओ क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कोट्यात २१५.०३ पट सब्सक्राइब झाला आहे. वारी एनर्जीजच्या आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांचा कोटा ५.४५ पट सब्सक्राइब करण्यात आला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एका तर, जास्तीत जास्त १४ लॉटसाठी सट्टा लावू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ९ शेअर्स आहेत. रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये किमान १३,५२७ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
१९९० मध्ये स्थापन झालेली ही देशातील सर्वात मोठी सोलर पॅनेल निर्मिती कंपनी आहे. कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता १२ गिगावॅट आहे. ३० जून २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनी चार ऊर्जा निर्मिती केंद्रे चालवते.
संबंधित बातम्या