Stock Market Updates : शेअर बाजारात आज मोठी पडझड सुरू असताना वारी एनर्जीजच्या शेअर बिनधास्त घोडदौड करत होता. बीएसईवर वारी एनर्जीजचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ३,०१५ रुपयांवर पोहोचला आणि ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. वारी एनर्जीजच्या शेअरमधील या तेजीमुळं अवघ्या १० दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. १० दिवसांत या शेअरमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅपही ८५,७०० कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे.
वारी एनर्जीजचा आयपीओ २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खुला झाला होता. तो २३ ऑक्टोबरपर्यंत खुला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १५०३ रुपये होती. बीएसईवर हा शेअर २८ ऑक्टोबर २०२४ रोजी २५५० रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर २३३६.८० रुपयांवर बंद झाला. त्यानंतही कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. वारी एनर्जीजचा शेअर आज ३०१५ रुपयांवर पोहोचला आहे. १५०३ रुपयांच्या इश्यू प्राइसवरून कंपनीच्या शेअर्सनं १०० टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे.
वारी एनर्जीजचा आयपीओ एकूण ७९.४४ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ११.२७ पट सब्सक्राइब झाला होता. तर कर्मचारी प्रवर्गातील हिस्सा ५.४५ पट होता. वारी एनर्जीजच्या आयपीओमध्ये नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) कॅटेगरीत ६५.२५ पट हिस्सा दिसला. तर पात्र संस्थात्मक खरेदीदार प्रवर्गाला २१५.०३ पट वर्गणी मिळाली. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १४ लॉटसाठी गुंतवणूक करू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ९ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १३,५२७ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
डिसेंबर १९९० मध्ये कंपनीची स्थापना झाली. ही कंपनी सोलर पीव्ही मॉड्यूलची निर्मिती करते. कंपनीची स्थापित क्षमता १२ गिगावॅट आहे. कंपनीच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये मल्टीक्रिस्टलाइन मॉड्यूल, मोनोक्रिस्टलाइन मॉड्यूल आणि टॉपकॉन मॉड्यूलचा समावेश आहे. ३० जून २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ही कंपनी चार उत्पादन केंद्रे चालवते.