Waaree Energies : वारी एनर्जीजची घोडदौड! कंपनीच्या तिमाही नफ्यात चौपटीनं वाढ, महसूलही वाढला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Waaree Energies : वारी एनर्जीजची घोडदौड! कंपनीच्या तिमाही नफ्यात चौपटीनं वाढ, महसूलही वाढला!

Waaree Energies : वारी एनर्जीजची घोडदौड! कंपनीच्या तिमाही नफ्यात चौपटीनं वाढ, महसूलही वाढला!

Jan 30, 2025 06:53 PM IST

Waaree Energies Profit News : ऊर्जा क्षेत्रातील वेगानं वाढणाऱ्या वारी एनर्जीजचे तिमाही निकाल जोरदार आले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीनं ४९३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा नफा चार पटींनी अधिक आहे.

Waaree Energies : वारी एनर्जीजचे तिमाही निकाल जाहीर; कंपनीच्या नफ्यात चौपटीनं वाढ
Waaree Energies : वारी एनर्जीजचे तिमाही निकाल जाहीर; कंपनीच्या नफ्यात चौपटीनं वाढ

Energy Stock News : वारी एनर्जीज लिमिटेडनं गुरुवार, ३० जानेवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत कंपनीनं मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत चार पटीहून अधिक नफा कमावला आहे. 

डिसेंबर तिमाहीत कंपनीला ४९३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो १२४.५ कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ११६ टक्क्यांनी वाढून ३,४५७ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी ही रक्कम १,५९६ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. वारी एनर्जीजकडं २६.५ गिगावॅटची ऑर्डर्स आहेत. या ऑर्डर्सची किंमत आजच्या घडीला ५०,००० कोटी रुपये आहे.

वारी एनर्जीजचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पैठणकर यांनी तिमाही निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. 'ऊर्जा संक्रमण कंपनी म्हणून आम्हाला अफाट संधी दिसत आहेत. आम्ही नवीन व्यवसायांमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहोत. आमचा सौर ऊर्जा व्यवसाय मजबूत असून आता ऊर्जा साठवण प्रणाली, ग्रीन हायड्रोजन, इन्व्हर्टर आणि नूतनीकरणक्षम पायाभूत सुविधांच्या सान्निध्यात वेगानं विस्तार करत आहोत, असं पैठणकर यांनी सांगितलं. या क्षेत्राच्या वाढीचा वेग पूर्वीपेक्षा अधिक असून आम्ही त्याचा फायदा घेण्यासाठी तयार आहोत, असंही ते म्हणाले.

काय करते ही कंपनी? 

वारी एनर्जी ही सौर पीव्ही मॉड्यूलची एक भारतीय उत्पादक आहे. या कंपनीची एकूण स्थापित क्षमता १२ गिगावॅट आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये मल्टीक्रिस्टलाइन मॉड्यूल - मोनोक्रिस्टलाइन मॉड्यूल, टॉपकॉन मॉड्यूल सारख्या पीव्ही मॉड्यूलचा समावेश आहे. 

शेअरमध्ये वाढ

कंपनीचा शेअर गुरुवारी १.२५ टक्क्यांनी वधारून २,२३५.०५ रुपयांवर बंद झाला. या वर्षी आतापर्यंत हा शेअर २० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आला होता. वारी एनर्जीचे शेअर्स २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बीएसई, एनएसईवर लिस्ट झाले होते. वारी एनर्जी आयपीओसाठी प्राइस बँड १४२७ ते १५०३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात दमदार झाली. एनएसईवर हा शेअर ६६.३ टक्के प्रीमियमवर २,५०० रुपयांवर लिस्ट झाला होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner