दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या वोडाफोन आयडियासाठी नव्या वर्षाचा पहिला दिवस जोरदार ठरला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आज जवळपास ६ टक्क्यांची वाढ होऊन हा शेअर १६.९५ रुपयांवर पोहोचला. मागच्या सहा महिन्यात शेअरनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून दिले आहेत.
दूरसंचार क्षेत्रात तीव्र स्पर्धेला सामोरी जाणारी व कर्जाचं ओझं डोक्यावर असलेली वोडाफोन आयडिया ही कंपनी आता सावरू लागली आहे. शेअरच्या वाटचालीवरून तरी तसं चित्र दिसत आहे. वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली होती. तोच ट्रेंड आज कायम राहिला.
वोडाफोन आयडियाच्या शेअरनं आज मुंबई शेअर बाजारात (BSE) १८.४२ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) १८.४० रुपयांची पातळी गाठली. कंपनीच्या शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या दोन दिवसांत शेअरच्या किमतीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इक्विटी इन्फ्युजनच्या वृत्तानंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. एका वृत्तानुसार, कंपनीचे प्रवर्तक कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या विचारात आहेत. व्होडाफोन आयडियानं गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. कुमार मंगलम बिर्ला हे सध्या आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन आहेत. हा समूह १४ क्षेत्रात कार्यरत आहे. या नियुक्तीमुळं गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
व्होडाफोन आयडियाचा शेअर आज १६.२४ रुपयांच्या पातळीवर उघडला. नंतर उसळी घेत थेट १८.४२ रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला. दिवसअखेर ५.९४ टक्क्यांनी वधारून हा शेअर १६.९५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५.७० रुपये आहे. मागच्या सहा महिन्यांत व्हीआयचा शेअर एनएसईवर १२४.५० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळं शेअर घेऊन काही वेळ वाट बघणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
वोडाफोन आयडिया कंपनीवर सध्या प्रचंड कर्ज आहे. मागील दोन तिमाहीची आकडेवारी पाहिल्यास कंपनीचा तोटा वाढलेला दिसत आहे. जून तिमाहीत कंपनीचा एकूण तोटा ७८४० कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत तो ८,७३८ कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र, सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ०.९ टक्क्यांनी वाढून १०,७१६ कोटी रुपये झाला आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)