share market updates : विदेशी ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सनं व्होडाफोन आयडियाच्या शेअरच्या किंमतीत केलेल्या भाकिताचे तीव्र पडसाद आज शेअर बाजारात उमटले. व्होडाफोन आयडियाचा शेअर तब्बल १४ टक्क्यांनी गडगडलाी बीएसईवर हा शेअर १४.४४ टक्क्यांनी घसरून १२.९१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
व्होडाफोन आयडियाचा शेअर विकण्याचा यापूर्वी दिलेला सल्ला गोल्डमन सॅक्सनं कायम ठेवला आहे. हा शेअर ८३ टक्क्यांहून अधिक घसरेल, असा अंदाज ब्रोकरेज फर्मनं वर्तवला. हा शेअर २.५ रुपयांपर्यंत खाली येईल, असं ब्रोकरेज फर्मनं म्हटलं आहे. त्याचा नकारात्मक परिणाम शेअरच्या भावावर झाला आहे. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे.
व्होडाफोन आयडियानं नुकतीच केलेली भांडवली उभारणी कंपनीसाठी सकारात्मक असली, तरी बाजारातील शेअरची घसरण थांबविण्यासाठी पुरेशी ठरणार नाही, असं ब्रोकरेज फर्मचं मत आहे, असं सीएनबीसी-टीव्ही १८ च्या अहवालात म्हटलं आहे. पुढील तीन ते चार वर्षांत शेअरमध्ये आणखी घसरण होईल, असं गोल्डमन सॅक्सनं म्हटलं आहे.
फ्री कॅश फ्लो स्थिर ठेवण्यासाठी व्होडाफोन आयडियाला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू) २०० ते २७० रुपयांनी वाढवावा लागेल, असं गोल्डमन सॅक्सचं मत आहे.
व्होडाफोन आयडियाची अतिशय हळूवार होत असलेली वाढ, परतावा आणि बॅलन्सशीटमुळं भारती एअरटेल आणि जिओच्या तुलनेत व्होडाफोन आयडियाच्या वाढीला मर्यादा आहेत, गोल्डमन सॅक्सच्या अहवालात म्हटले आहे.
सकाळी १०.४५ वाजता बीएसईवर व्होडाफोन आयडियाचा शेअर १२.१९ टक्क्यांनी घसरून १३.२५ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर तो काहीसा सावरला. साडेअकराच्या सुमारास हा शेअर १३.४४ रुपयांवर व्यवहार करत होता.