Share Market News Today : किंमत अवघी १० रुपयांपर्यंत असल्यामुळं छोट्या गुंतवणूकदारांचा लाडका असलेल्या व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज वादळी वाढ झाली. टेलिकॉम कंपन्यांची समायोजित सकल महसुलाची (Adjusted Gross Revenue) थकबाकी माफ करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याच्या वृत्तानंतर ही वाढ झाली आहे. हा शेअर किंमत सोमवारी, २० जानेवारी रोजी बीएसईवर १० टक्क्यांनी वधारून १०.०३ रुपयांवर खुला झाला व आज दिवसभरात १०.४० रुपयांवर पोहोचला.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार टेलिकॉम कंपन्यांची एजीआर थकबाकी माफ करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २०१९ च्या आदेशानंतर व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल सारख्या टेलिकॉम कंपन्यांना आकारण्यात आलेल्या एजीआर थकबाकीपैकी ५० टक्के व्याज आणि दंडावरील १०० टक्के दंड आणि व्याज माफ करण्याचा विचार सरकार करत आहे.
एजीआर म्हणजे टेलिकॉम ऑपरेटर्सना त्यांच्या कोअर सर्व्हिसेसमधून मिळणारा महसूल. ट्रायच्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२४ या तिमाहीत टेलिकॉम ऑपरेटर्सचा एकूण महसूल १०.५ टक्क्यांनी वाढून ९१,४२६ कोटी रुपये झाला आहे. ज्याच्या आधारे सरकार कर आकारणी करते तो समायोजित सकल महसूल म्हणजे एजीआर वार्षिक आधारावर १३.११ टक्क्यांनी वाढून ७५,३१० कोटी रुपये झाला आहे. व्होडाफोन आयडियाचा एजीआर ४.३९ टक्क्यांनी वाढून ७५०७.६५ कोटी रुपयांवरून ७८३६.९८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये गेल्या सलग पाच सत्रांपासून (१४ जानेवारीपासून) वाढ होत आहे. आजचा १०.०३ रुपयांचा उच्चांक लक्षात घेता या पाच सत्रांमध्ये शेअरनं जवळपास ३० टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
हा शेअर २८ जून रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर १९.१५ रुपयांवर पोहोचला होता, तर गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ६.६० रुपयांवर पोहोचला होता.
ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांच्याकडं यापूर्वी व्होडाफोन आयडियाचे २७९, ०१७, ७८४ इक्विटी शेअर्स होते (कंपनीच्या इक्विटी भागभांडवलाच्या ०.४० टक्के) कंपनीनं प्रिफरेंशियल इश्यूद्वारे अतिरिक्त १०,८४,५९४,६०७ इक्विटी शेअर्स खरेदी केले.
उषा मार्टिन टेलिमॅटिक्स लिमिटेड (यूएमटीएल) या टेलिकॉम कंपनीचे ९१,१२३,११३ इक्विटी शेअर्स (इक्विटी भागभांडवलाच्या ०.१३ टक्के) मालकीचे असून, त्यांनी अशाच प्रेफरेंशियल इश्यूच्या माध्यमातून ६०८,६२३,७५४ अतिरिक्त इक्विटी शेअर्स मिळवले आहेत.
संबंधित बातम्या