Vi Share Price : कंपनीनं ११,६५० कोटींचं कर्ज फेडताच शेअर उसळला! अजूनही १० रुपयांपेक्षा कमी भाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vi Share Price : कंपनीनं ११,६५० कोटींचं कर्ज फेडताच शेअर उसळला! अजूनही १० रुपयांपेक्षा कमी भाव

Vi Share Price : कंपनीनं ११,६५० कोटींचं कर्ज फेडताच शेअर उसळला! अजूनही १० रुपयांपेक्षा कमी भाव

Dec 30, 2024 01:36 PM IST

Vi share Price : दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाच्या शेअरनं आज उसळी घेतली आहे. कंपनीनं ११,६५० रुपयांचं कर्ज फेडल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

Vi Share Price : कंपनीनं ११,६५० कोटींचं कर्ज फेडताच शेअर उसळला! अजूनही १० रुपयांपेक्षा कमी भाव
Vi Share Price : कंपनीनं ११,६५० कोटींचं कर्ज फेडताच शेअर उसळला! अजूनही १० रुपयांपेक्षा कमी भाव

Stock Market News Today : मागील दहा वर्षांपासून गुंतवणूकदारांना रडवणारा व्होडाफोन आयडियाचा शेअर अधूनमधून आशेची ठिणगी टाकत असतो. आजही तेच घडलं आहे. बीएसईवर कंपनीच्या शेअरनं एका क्षणी तब्बल ७ टक्क्यांची उसळी घेतली. 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, आज सकाळी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स आज आठ रुपयांच्या पातळीवर उघडले. व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागं दोन मोठ्या बातम्या कारणीभूत मानल्या जात आहेत.

रिफॉर्म पॅकेजच्या आधी आयोजित केलेल्या स्पेक्ट्रम लिलावासाठी बँक गॅरंटी सादर करण्याची अट दूरसंचार विभागानं काढून टाकली आहे. दूरसंचार विभागाच्या या निर्णयाचं व्होडाफोन-आयडियानं स्वागत केलं आहे. २७ डिसेंबर रोजी दूरसंचार विभागात हा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळं भारतात ४जी आणि ५जी मधील गुंतवणुकीला चालना मिळेल असं कंपनीचं म्हणणं आहे. तसंच, शेअर्सच्या बदल्यात उभारलेल्या १०.९ कोटी पौंडांची म्हणजेच सुमारे ११,६५० कोटी रुपयांची थकबाकी कंपनीनं परत केली आहे.

कंपनीनं काय म्हटलं आहे?

व्होडाफोन समूहानं कर्ज उभारण्यासाठी VIL मधील आपला संपूर्ण हिस्सा गहाण ठेवला होता. मॉरिशस आणि भारत स्थित व्होडाफोन समूहातील संस्थांनी कर्ज उभारण्यासाठी HSBC कॉर्पोरेट ट्रस्टी कंपनी (UK) च्या नावे समभाग तारण ठेवले होते. 

कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, 'व्होडाफोनच्या प्रवर्तकांचं कर्ज फेडल्यानंतर कर्जदारांसाठी सुरक्षा विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या एचएसबीसी कॉर्पोरेट ट्रस्टी कंपनी (UK) लिमिटेडनं तारण म्हणून ठेवलेले शेअर्स २७ डिसेंबर रोजी जारी केले आहेत. व्होडाफोन इंडिया लिमिटेडमध्ये व्होडाफोन ग्रुपचा हिस्सा २२.५६ टक्के आहे, तर आदित्य बिर्ला ग्रुपचा हिस्सा १४.७६ टक्के आणि सरकारचा २३.१५ टक्के आहे.

शेअरचा सध्या भाव काय?

गेल्या वर्षभरात व्होडाफोन आयडियाच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये ५४ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर, सहा महिन्यात कंपनीचा शेअर ५६ टक्क्यांनी घसरला आहे. आज ७ टक्क्यांनी उसळलेला शेअर सध्या (दुपारी १.३० वाजता) ३.७५ टक्क्यांनी वधारून ७.७५ रुपयांवर ट्रेड करत आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner